• Fri. Dec 27th, 2024
    जवळचा मित्र सोडून गेला, राहुल गांधींनी दोस्ती निभावली, कुटुंबाच्या सांत्वनाला महाबळेश्वरला

    Rahul Gandhi At Mahabaleshwar: राहुल गांधी यांचे खास मित्र रायन बनाजी यांचं निधन झालं, आज त्यांच्यावर महाबळेश्वर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी राहुल गांधी हे महाबळेश्वरला आले होते.

    Lipi

    संतोष शिराळे, सातारा : आपला मित्र रायन बनाजी यांच्या अंत्यविधीसाठी संसदेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे आज महाबळेश्वर येथे आले होते. मित्राच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून धार्मिक विधी पूर्ण होईपर्यंत ते बनाजी यांच्या बंगल्यातच थांबले होते. त्यानंतर रायन बनाजी यांच्यावर पारशी स्मशानभूमीत राहुल गांधी यांच्या उपस्थितीतच दफनक्रिया पार पडली. अंत्यसंस्काराचे सर्व सोपस्कार उरकूनच राहुल गांधी यांनी कुटुंबीयांचा निरोप घेतला.

    मुंबई येथील प्रसिध्द डोळेतज्ञ डॉ. बनाजी यांनी राहुल गांधी यांच्या डोळ्याची तपासणी करून त्यांच्या डोळ्यावर उपचार केले होते. तेव्हापासून गांधी आणि बनाजी कुटुंबीयांमधील संबंध अधिकच दृढ झाले होते. हे नातं दोन्ही घरांनी जपले होते. डॉ. बनाजी यांचे चिरंजीव रायन हे पोतुर्गालची राजधानी लिस्बन येथे होते. ते नियमित जिमला जात होते. काही दिवसांपूर्वी जीममध्ये व्यायाम करीत असताना रायन बनाजी यांना हार्ट अटॅक आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले. रायन यांनी निधनापूर्वी आपले अंत्यविधी महाबळेश्वर येथे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मुलाच्या इच्छेनुसार डॉ. बनाजी यांनी आपल्या मुलाचे पार्थीव महाबळेश्वर येथील शापूर हॉल या बंगल्यावर आणले.

    १६ तारखेला दुपारी साडेबारा वाजता रायन बनाजी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मित्राच्या अंत्यसंस्कारासाठी राहुल गांधी यांनी महाबळेश्वर येथे जाण्याचा निर्णया घेतला. महाबळेश्वर दौऱ्यासाठी १५ तारखेला रात्री राहुल गांधी यांचे पुणे येथे आगमन झाले. आज सकाळी पुण्याहून प्रचंड पोलीस बंदोबस्तात ते महाबळेश्वरला पोहोचले. रायन बनाजी यांचे पार्थीव ठेवलेल्या बंगल्यावर सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळी दहा वाजता राहुल गांधी यांचे महाबळेश्वर येथे आगमन झाले. त्यांनी शापूर बंगला येथील रायन बनाजी यांच्या पार्थीवाचे दर्शन घेतले व बनाजी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

    पारशी धर्मानुसार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. पार्थीवाचे दर्शन घेण्यासाठी व अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी नातेवाईकांची शापूर बंगल्यावर गर्दी झाली होती. शहरातील पारशी समाज बांधवही सकाळपासून शापूर बंगल्यावर उपस्थित होते, तर शहरातील काही प्रतिष्ठीत नागरिक पार्थीवाच्या दर्शनासाठी बंगल्यावर हजेरी लावत होते.

    दुपारी बारा वाजता रायन बनाजी यांचे पार्थीव एका रुग्णवाहिकेतून पारशी स्माशानभूमीकडे हलविण्यात आले. राहुल गांधी हे स्वतः आपल्या मित्राच्या पार्थीवाबरोबर त्या रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत गेले. त्या ठिकाणी पारशी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे रायन बनाजी यांच्या पार्थीवावर दफन संस्कार करण्यात आले. अंतिम संस्कारानंतर राहुल गांधी हे पुन्हा डॉ. बनाजी यांच्या बंगल्यावर गेले. तेथे पुन्हा त्यांनी बनाजी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना दिलासा दिला. दुपारी तीन वाजता राहुल गांधी हे पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

    महाबळेश्वर येथे आलेले संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुण्याला रवाना होताना शापूर बंगल्या बाहेर आलेल्या काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची धावती भेट घेतली. जाता जाता त्यांनी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन केले. काँग्रेसचे नेते विराज शिंदे, सलिम बागवान या कार्यकर्त्यांनी गांधी यांना स्ट्रॉबेरी भेट दिली.

    राहुल गांधी यांचा हा दौरा अत्यंत खाजगी होता. यावेळी कोणत्याही काँग्रेस नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेटू नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिल्याने आज त्यांच्या दौऱ्यावेळी सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी हे महाबळेश्वरकडे फिरकलेही नाहीत.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed