Chhagan Bhujbal: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी ४ वाजता नागपुरातील राजभवनात संपन्न होणार आहे. मंत्रिपदांसाठी निवड झालेल्या आमदारांना फोन गेले आहेत. त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा नागपुरातील देशपांडे हॉलमध्ये सुरु आहे. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित आहेत. तटकरे, पटेल यांची भाषणं झाली आहेत. पण नागपुरात असूनही छगन भुजबळ या मेळाव्याला अनुपस्थित आहेत. त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यांच्या गैरहजेरीची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अखेर कॅबिनेट विस्ताराला मुहूर्त, शिंदेंकडे पुन्हा ‘लाडकं खातं’; फडणवीस ‘ती’ परंपरा मोडणार?
माजी उपमुख्यमंत्री, ओबीसींचे नेते असलेले छगन भुजबळ काल रात्री उशिरा नागपुरात पोहोचले. त्यांचा मुक्काम सध्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात आहे. ज्या आमदारांना मंत्रिपदं मिळणार आहेत, त्या आमदारांना पक्षातील प्रमुख नेत्यांकडून फोनाफोनी सुरु आहे. भुजबळ यांना अद्याप तरी मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन गेलेला नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे.
छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला गेलेले नाहीत. या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. मंत्रिपदासाठी नावं निश्चित झालेले आमदारही मेळाव्याला हजर आहेत. संध्याकाळी शपथ घेणार असलेले सगळे आमदार व्यासपाठीवर विराजमान आहेत. पण भुजबळ अनुपस्थित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. पण त्यांनी यावर उत्तर देणं टाळलं.
फडणवीसांच्या टीममध्ये आणखी एक विश्वासू; ठाकरेंनी हटवलेल्या अधिकाऱ्याची CMOमध्ये वर्णी
राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरु असलेलं देशपांडे सभागृह आणि भुजबळांचा मुक्काम असलेलं रॅडिसन ब्ल्यू हॉटेल एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर आहे. हे अंतर कापण्यासाठी अवघी १६ मिनिटं लागतात. पण भुजबळांनी पक्षाच्या मेळाव्याला जाणं टाळलं. मंत्रिपद नसल्यानं भुजबळ नाराज आहेत का? त्यामुळेच त्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली का?, अशा चर्चा आता जोर धरु लागली आहे.

