आजपासून (७ डिसें.) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झालंय. राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे. आजपासून पुढचे ३ दिवस हे विशेष अधिवेशन सुरू असणार आहे. या अधिवेशनावेळी विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी पार पडत आहेत. आज आमदारांच्या शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आमदारकीची शपथ घेतलीये. तर विरोधकांनी मात्र शपथविधीवर बहिष्कार टाकला. दरम्यान या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे समोरासमोर आले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरेंची ही पहिलीच भेट आहे. विधनभवनाच्या पायऱ्यांवर नव्या मुख्यमंत्र्यांचं फोटोसेशन सुरू असताना त्याच वेळी आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल झाले. आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पाहताच त्यांना हात मिळवला आणि त्यांचं अभिनंदनही केलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या या भेटीचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतो आहे आणि या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झालीये.