लोणावळ्यातून राजेश भारत पिंपळे (वय २९) आणि अक्षय ऊर्फ सोन्या श्रीपाल गायकवाड (वय २७, दोघे रा. लोणावळा) हे १८ जुलै २०१५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार अक्षयच्या वडिलांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात दिली होती. या खटल्यातील मुख्य आरोपी किसन नथू परदेशी (रा. गावठाण, लोणावळा) याने अंडाभुर्जीच्या गाडीच्या जागेभाड्यावरून झालेल्या भांडणाच्या रागातून साथीदारांच्या मदतीने राजेश व अक्षयला स्वत:च्या मोटारीत बसवून त्यांचा खून करून दोघांचे मृतदेह ताम्हिणी घाटात खोल दरीत फेकून दिल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले.
या खटल्यात किसन परदेशी याच्यासह शारदा किसन परदेशी (वय ४९), यास्मिन लतीफ सैयद (वय ३६), अजय कृष्णण केसी (वय २२), अश्विन चंद्रकांत शिंदे (वय २९), सुनील बाबू पाटेकर (वय ४९), विकास ऊर्फ गोग्या सुरेश गायकवाड (वय २४), जगदीश ऊर्फ जग्गू मोरे, सादिक इब्राहिम बंगाली, विनायक ऊर्फ विनय ढोरे, आकाश सतीश चंडालिया, ब्रिजेश उर्फ बंटी डावरे, सलीम शेख, सुभाष ऊर्फ महाराज गोविंद धाडगे अशा चौदा संशयित आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. बचाव पक्षातर्फे अॅड. मिलिंद पवार, अॅड. झाहिद कुरेशी, अॅड. अतुल गायकवाड, अॅड. अनिकेत जांभूळकर, अॅड. सूरज देसाई, अॅड. विनायक माने, अॅड. व्ही. आर. राऊत, अॅड. आर. जी. कांबळे यांनी काम पाहिले.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकिलांनी चौदा साक्षीदारांची साक्ष नोंदवली. पोलिसांना सापडलेले सांगाडे राजेश व अक्षयचे नसल्याचे ‘डीएनए’ चाचणीत निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपींना विनाकारण गोवले असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने न्यायालयात केला. तो ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.