नाशिकच्या सातपूर भागातील परिसरात एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महेंद्रसिंग या १९ वर्ष तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. या घटनेने सातपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महिंद्र हा सातपूर येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता. अक्षय सिंग याची आज सकाळी पाईपलाईन रोड परिसरात रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ सातपूर पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची माहिती घेऊन पोलिस तपास करत आहेत. पंचनामा करून मृत महेंद्रसिंग ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे.
महेंद्रसिंग हा मूळचा नेपाळ येथील असल्याची माहिती मिळत आहे. तो एका हॉटेलमध्ये कामाला होता. आज सकाळी त्याची हत्या झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. ही हत्या नेमकी कशी झाली आणि का झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सातपूर पोलिस यासंदर्भात तपास करत आहेत.
दरम्यान, सातपूर येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १९ वर्षीय युवकाची हत्या झाली. तर गेल्या काही दिवसांपूर्वी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगेत कोयता सापडला होता. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसरात अठरा वर्षाखालील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात टोकाचे वाद सुरू असून गुन्ह्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, ही हत्या स्थानिक टोळी युद्धातून झाली असावी असा देखील अंदाज वर्तवला जात आहे.
सातपूर येथील हत्येच्या घटनेनं पुन्हा नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. ही हत्या नेमकी कशी झाली याचा तपास पोलीस करत आहेत. तरी, सततच्या गुन्ह्याच्या घटनांमुळे नाशिक गुन्हेगारीत अव्वल ठरत असल्याचं चित्र आहे. नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याची खंत नाशिककर व्यक्त करू लागले आहेत. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आता नाशिक पोलीस काय ठोस पावलं उचलणार हे बघावं लागणार आहे.