• Mon. Nov 25th, 2024
    कोल्हापूर, साताऱ्याची जागा निसटली मग कसला ४५ प्लस, जयंत पाटलांनी भाजपची खिल्ली उडवली

    कोल्हापूर: भाजपने यंदाचा निवडणुकीत ४५ प्लसचा नारा दिला आहे. मात्र, कोल्हापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे. मग भाजपचा या निवडणुकीतील त्यांचा नारा हा कुचकामी ठरणार आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. तसेच, हातकणंगले राजू शेट्टींनी महाविकास आघाडीचा पाठिंबा न घेतल्यास तिथे उमेदवार द्यावाच लागेल, असे ही पाटील म्हणाले आहेत, ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.

    महाविकास आघाडी हातकणंगलेत उमेदवार देणार

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एकला चलो रे चा नारा दिला आहे. मात्र, आपल्याला महाविकास आघाडीने बाहेरून पाठिंबा द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन निवडणूक लढवावी असा प्रस्ताव ठाकरे गटाने राजू शेट्टी यांच्या समोर ठेवला आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी याला नकार दिला असल्याने आता राजू शेट्टी यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार असल्याचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

    हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टींनी महाविकास आघाडीत न आल्यास तिथे उमेदवार द्यावाच लागेल. महाविकास आघाडीला सगळ्या जागेवर उमेदवार द्यावे लागणार आहेत, असेही पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील (सरूडकर), डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्यासह आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्यापैकी महाविकास आघाडीकडून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

    कोल्हापूर, सातारा महायुती गमावणार

    कोल्हापूर आणि साताऱ्यात महाविकास आघाडी दोन्ही जागा जिंकणार आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा कमी होतील मग कसला ४५ प्लसच दावा? असा सवाल उपस्थित करत आमदार जयंत पाटील यांनी माढा लोकसभेबाबातही भाष्य केलं. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकरांना माढा लोकसभा देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार साहेबांनी दिले होते, मात्र ते महायुतीसोबत गेले.

    निलेश लकेंनी बांध फोडला, आता अनेक जण बाहेर पडायला उत्सुक; जयंत पाटलांचं सूचक विधान

    माढा लोकसभेसाठी आता नवीन उमेदवार शोधावा लागेल, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. तसेच, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेत उमेदवार जाहीर केला आहे. यातून काही तोडगा निघतो का याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच, वंचितबाबत दोन दिवसात निर्णय होईल असंही आमदार जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *