अमरावती, दि. 21 (जिमाका): लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीना कायदेशिर तरतुदी व प्रचारासंबंधातील साहित्य व वस्तूच्या दराची माहिती देण्यात आली. राजकीय पक्ष प्रतिनिधींनी निवडणुका पारदर्शक, भयमुक्त व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात राजकीय पक्ष प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार बोलत होते. उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, खर्च संनियंत्रक नोडल अधिकारी चंद्रशेखर खंडारे, सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख, दिनेश मेतकर तसेच भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राजकीय पक्षाच्या बैठकीमध्ये उमेदवारांच्या खर्चाच्या संदर्भात सर्व कायदेशिर तरतुदींबाबत अवगत करण्यात आले. जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक विधानसभेनिहाय उमेदवारांच्या निवडणूकीवर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी संनियंत्रण पथकाची स्थापना केली असून जिल्हा नियोजन भवनाच्या इमारतीमध्ये खर्च संनियंत्रण पथक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. खर्चाचे अचूक लेखांकन होण्याकरीता जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रचारासंबंधातील वस्तु, साहित्य व सेवांचे दर निश्चित करण्याकरिता विविध शासकीय कार्यालय तसेच खुल्या बाजारातुन दरपत्रक मागविण्यात आले. प्राप्त झालेल्या दराची माहिती सर्व राजकीय पक्षांना देण्यात आली. उमेदवारांना 95 लक्ष रूपये खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून यापेक्षा जास्त खर्च होवून आचार संहीतेचे उल्लंघन होणार नाही याबाबत काळजी घेण्यात यावी. आचारसंहीता अंमलबजावणीकरीता राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी यावेळी केले.
00000