यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, देशात सरकार येणार येणार म्हणून सर्वांना झुलवत कुणी ठेवले तर ते पवारांनी ठेवले. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा पराभव एवढे एकच ध्येय आहे.
चंद्रकांत पाटील यांनी थेट बारामतीत येऊन शरद पवार यांना चॅलेंज दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लोकसभेची जय्यत तयारी सुरू झालेली दिसत आहे. भाजपचे दिग्गज नेते बारामतीत लक्ष घालू लागले आहेत. थेट शरद पवार यांना आव्हान देऊ लागले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे बारामतीच्या पैलवानाला थेट आखाड्यात येऊन चॅलेंज देण्याचे काम सुरू आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप व महायुतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांना घेरण्याचा ताकदीने प्रयत्न सुरु केला आहे. काल लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागताच आज बारामतीत महायुतीने मेळावा घेत हे दाखवून दिले. या मेळाव्यात उच्चतंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी काही दिवसातच समोरील पैलवानाने स्वतःहून हार मानली तर आश्चर्य वाटायला नको, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्राचा सध्या कागदावरील हिशोबात महायुतीचे पारडे जड ठरते आहे. सहापैकी बारामती,इंदापूर, दौंड व खडकवासला या चार ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत. तर भोर व पुरंदर या दोन ठिकाणी मविआचे आमदार आहेत. परंतु भोर व पुरंदर हे दोन्ही तालुके मतदानाच्या तुलनेने छोटे मानले जातात. महायुतीचे सध्या येथे वर्चस्व दिसून येते. अर्थात महायुतीत काही ठिकाणी कुरबुर सुरु असून त्यावर इलाज करण्याचे काम भाजपने हाती घेतले आहे.
भाजपने यंदा देशात ३७० तर एनडीएला ४०० हून अधिक जागा मिळाव्यात असे टार्गेट ठेवले आहे. त्यात बारामतीची जागा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. रविवारच्या मेळाव्यात पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. मागील वेळी त्यांनी सोबत येतो, असे सांगत टाळाटाळ करत पंतप्रधानांची फसवणूक केली. या फसवणूकीचा, अपमानाचा बदला घ्या असे आवाहन त्यांनी केले. हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे यांच्याबाबतच्या शंकांनाही त्यांनी पूर्णविराम दिला.
बारामतीतील मेळाव्याला हर्षवर्धन पाटील गैरहजर होते.त्यासंबंधी पाटील म्हणाले, ते पुतण्याच्या विवाहामुळे पूर्वसंमतीने गैरहजर राहिले आहेत. त्यांनी कालच फोन करून त्याची कल्पना दिली असून ते आमच्यासोबत आहेत अशी ग्वाही दिली. इथे प्रत्येकाला पुढील गॅरंटीची गरज आहे. ती गॅरंटी त्यांना मिळाली की सगळे एकत्र फिरताना दिसतील. देवेंद्र फडणवीस नावाचे औषध आमच्याकडे आहे. देवेंद्र त्यांच्यासोबत बोलले की सगळे ठीक होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
विजय शिवतारे यांची समजूत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढतील. देवेंद्र फडणवीस व त्यांचेही चांगले संबंध आहेत. त्यामुळे तुम्ही उगाच चिंता करू नका, असे माध्यमांना सांगायलाही पाटील विसरले नाहीत. बारामतीतील दौऱ्याची सुरुवातच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग भवन या निवासस्थानापासून केली. संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर ते मेळाव्याला रवाना झाले.
दरम्यान बारामती दौऱ्यात त्यांनी मतांचे गणित मांडले. गत निवडणूकीत भाजपाला ५ लाख ३१ हजार मते मिळाली होती. तर विजयी उमेदवार सुप्रिया सुळे यांना ६.५० लाख मते मिळाली होती. आता अजित पवार सोबत आहेत. ते किमान दोन लाख मते घेवून बाहेर पडले आहेत. महायुतीत सहभागी १६ घटकपक्ष आणि केंद्र व राज्याने केलेली ढिगभर कामे विचारात घेता आमचा उमेदवार ८ लाखांवर जाईल तर विरोधी उमेदवार ४ ते ४.५० लाखाच्या आसपास राहिल असे गणित त्यांनी मांडले. त्यांचे हे गणित प्रत्यक्षात कसे उतरते हे येत्या निवडणूकीतच समजू शकेल.