मुंबई महापालिकेच्या मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंडरिंगप्रकरणी रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडी चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलेले आमदार रवींद्र वायकर यांच्या शिंदेसेनेच्या प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. अखेर त्यांनी आज रात्री नऊ वाजताच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी भगवा ध्वज हाती घेत, देशातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारचे कौतुक करत अधिकृतपणे प्रवेश केला.
आरेच्या रस्त्यासाठी मला १७३ कोटींच्या निधीची मला आवश्यकता आहे. आरे रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने लोक रडत आहेत. तिकडे ४५ किलोमीटरचे रस्ते होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रॉयलपंप सारख्या परिसरात उत्तम पाण्याची व्यवस्था नाहीये. अशा वेळेला धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असते. जर आपण असे निर्णय घेतले नाही तर कामे थांबतात. म्हणून प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला, असे सांगून त्यांनी आपल्याजवळील प्रलंबित कामांच्या प्रस्तावांची नस्ती मुख्यमंत्री शिंदे यांच्या हवाली केली.
रवींद्र वायकर यांची राजकीय कारकीर्द
- रवींद्र वायकर हे शिवसेनेचे ३ टर्मचे आमदार आहेत
- गेली १५ वर्ष ते जोगेश्वरी मतदारसंघातून निवडून येतात
- त्याआधी त्यांनी मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम केलं
- शिवसेनेकडून ते चार वेळा नगरसेवक राहिलेले आहेत
- फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम केलंय
