• Mon. Nov 25th, 2024
    उद्या अजितदादांची गाडी पुसायला कमी करणार नाही… आढळरावांवर बोचरी टीका

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यामध्ये पक्ष फुटल्याने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना मोठी सहानुभूती आहे. सहानुभूती आहे म्हणून हवेत राहून चालणार नाही. तर मतांच्या रुपाने ती मिळविण्यासाठी लोकापर्यंत पोहोचा, अशी सूचना शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना केली.

    उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक निसर्ग मंगल कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच शिवसेनेच शहरप्रमुख संजय मोरे आदी उपस्थित होते.

    निधीची नव्हे, निष्ठेची लढाई

    कार्यकर्त्यांनी निधी मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्याचा धागा पकडून, ‘निवडणुकीत आम्ही मित्र पक्षाची जबाबदारी घेतली आहे. जिल्हा परिषदांचे गट, गणांपर्यंत बैठका घ्या. निधी तात्पुरता मिळेल, मात्र निष्ठा कायमची ठेवा. तुम्हाला निवडणुकीत आमिष दाखविले जातील. सर्वांना बाजूला ठेऊन ही निधीसाठीची लढाई नाही तर निष्ठेची लढाई लढायची आहे, अशा शब्दांत संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. मतांच्या रुपाने आपल्याला सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
    आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा

    शिवतारे, आढळरावांवर टीका

    पुरंदरमध्ये ज्यांच्या विरोधामुळे पक्ष सोडला तेच आता राष्ट्रवादीच्या दादांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशा शब्दांत विजय शिवतारे यांचे नाव घेता अहिर यांनी टीका केली. तर शिरूरमध्ये दुसऱ्या पक्षात असूनही उमेदवारीसाठी ते गाड्यांमध्ये फिरत आहेत. उद्या गाडी पुसायला कमी करणार नाही, अशा खरमरीत टीका शिवाजीराव आढळराव यांचे नाव न घेता त्यांनी केली. ज्यांना झोप येत नाही त्यांची आता त्यांच्याच पक्षाचे लोक झोप उडवू लागले आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता अहिर यांनी त्यांना टोला लगावला.
    बारामतीतला जो विधानसभा मतदारसंघ सुळेंना पडतो महागात, आता तिथेच सुनेत्रा पवारांना लीडची संधी

    निधी अन् स्थानिक निवडणुकांची चिंता

    शिवसेनेचे खडकवासला, हवेली पुरंदर या विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडल्या. ‘निवडणुकीला काम जरूर करू. पण विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसने आमची आठवण ठेवावी. जिल्हा नियोजन समितीतून आम्हाला निधी मिळायला हवा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला न्याय द्यावा,’ अशा विविध मागण्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्या. त्यावर सुप्रिया सुळे यांनी, पुढील निवडणुकांबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, त्यानुसार साथ देत राहू असे आश्वासन दिले.
    कोणी धमकावत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा, पुतण्या युगेंद्र पवारांचा अजितदादांशी पंगा

    कार्यकर्त्यांचा सन्मान ठेऊ

    आमच्या कार्यकर्त्यांना चांगली वागणूक मिळायला हवी, अशी तक्रार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर ‘महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला जाईल,’ अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी दिली. ‘आपण सर्व एक आहोत. एक कोणी पक्षाचा उमेदवार नाही, तर आपण सर्वजण ४८ जागा लढवित आहोत, असे समजून काम करू. मतदारसंघातील नऊ तालुक्यांमध्ये प्रत्येक पक्षाचे एक असे चार कार्यकर्त्यांचा एक गट स्थापन करून त्यांच्यामार्फत यंत्रणा कार्यरत करू, अशी सूचना सुळे यांनी केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *