• Sat. Nov 16th, 2024

    कारागृह हे सुधारगृह व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Mar 5, 2024
    कारागृह हे सुधारगृह व्हावे – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि. 5 मार्च : कारागृहात राहणे, ही म्हटले तर शिक्षा आहे आणि एका दृष्टीने दीक्षाही आहे. वाल्याचा वाल्मिकी झाल्याची कथा सर्वांनी ऐकली आहे. आज तुम्ही सारे आंधारात आहात, कदाचित चांगल्या वर्तणुकीने उद्या प्रकाशात याल. बाहेर आल्यानंतर तुमच्या हातून उत्तम काम व्हावे, यासाठी हे केवळ कारागृह न राहता सुधारगृह व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    जिल्हा कारागृह येथे वरिष्ठ तुरंगाधिकारी निवासस्थानाचे भूमिपूजन व महिला – पुरुष बंदीसाठी स्वतंत्र बॅरेक्सचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी कारागृहाचे अधिक्षक अनुपकुमार कुमरे, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, अभियंता श्री. येरगुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी सतिश सोनवणे, नागेश कांबळे, तुरुंगअधिकारी महेश माळी, जनरल सुभेदार महेंद्र हिरोळे आदी उपस्थित होते.

    येथील निवासस्थान व इतर सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून 2 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, क्षमतेपेक्षा जास्त संख्या या कारागृहात आहे. चार वर्षांपूर्वी येथील व्यवस्थेची पाहणी केली असता विविध सोयीसुविधांसाठी 14 कोटी रुपये दिले. हा केवळ तुरुंग न राहता हे सुधार केंद्र व्हावे, यासाठी 33 कोटींची मागणी करण्यात आली आहे. कारागृहाची क्षमता 486 असून सद्यस्थितीत येथे 720 कैदी आहेत. त्यामुळे क्षमतेमध्ये तसेच सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याच्या सुचना प्रशसनाला दिल्या आहेत.

    पुढे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, येथे वाचनालय आणि खेळाचे प्रकार आहेत. कैद्यांना वाचण्यासाठी उत्तमातीत उत्तम पुस्तके आपण स्वत:च्या ‍निधीमधून देण्यासाठी तयार आहोत. प्रत्येकाच्या मनात द्वंद सुरू असते. त्यामुळे चांगली आणि दर्जेदार पुस्तके वाचली तर मनातील द्वंद संपुष्टात येऊ शकते. या कारागृहात आयुष्याचे तत्व शिकण्याचे, उत्तम संस्काराचे शिक्षण मिळावे, अशी अपेक्षा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    यावेळी त्यांनी कारागृह परिसरात असलेल्या हजरत मखदुम शहाबुद्दीन शहा यांच्या दर्ग्याला भेट देऊन पाहणी केली. तसेच चादर चढवून प्रार्थना सुद्धा केली. सोबतच कारागृहाच्या नवीन बराकीचे आणि येथे कैद्यांसाठी नव्याने बांधलेल्या रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

    14 कोटी रुपयांतून झालेल्या सुविधा

    चंद्रपूर जिल्हा कारागृहात 500 बंद्यांकरीता नवीन बॅरेक्सचे बांधकाम व अन्य अनुषंगिक कामांतर्गत पुरुष बंद्यांकरीता 2 बॅरेक इमारतींचे बांधकाम, महिला बंद्यांकरीता बॅरेक इमारत, पुरुष विभक्त बंदी कक्ष, महिला विभक्त बंदी कक्ष, दवाखाना, तपासणी कक्ष, पुरुष कक्ष, महिला कक्ष, औषध भांडार आदी कामे करण्यात आली आहेत.

     

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed