लातूर, दि. 23 : नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यातील 2 लाखापेक्षा अधिक उमेदवारांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, हे आपले उद्दिष्ट आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्याप्रमाणेच राज्यातील इतर विभागातही अशा मेळाव्यांचे आयोजन होणार असल्याने सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी एक टीम म्हणून हे मेळावे यशस्वी करण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
लातूर येथे आयोजित छत्रपती संभाजीनगर विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा या कार्यक्रमाला दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, आमदार रमेश कराड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश दाखविण्यात आला.
तरूणांसाठी रोजगार हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून त्यात त्याच्या कुटुंबाचे समाधान आणि समृद्धता दडलेली आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी पूर्वी लोकांना हेलपाटे मारावे लागत आणि केवळ त्यामुळे सर्वसामान्य नागरिक योजनांचे लाभ घेत नव्हते. अशा सर्व योजनांचे लाभ शासन आपल्या दारी उपक्रमांतून एका छताखाली देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आतापर्यंत जवळपास 2 कोटी 60 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना या उपक्रमातून लाभ देण्यात आले. याच भावनेतून एकाच छताखाली रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूरचा नमो रोजगार महामेळावा यशस्वी झाला. जवळपास 350 हून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला. त्याचे यश पाहूनच आपण दरवर्षी विभागस्तरावर महारोजगार मेळावा घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष मुख्य समन्वयक म्हणून काम करत आहे. बेरोजगार युवक- युवतींना रोजगार मिळेल, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या मेळाव्यात सहभागी तरूण-तरूणींची कुशल, अकशुल, निमकुशल अशी वर्गवारी करून कंपन्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे काम केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मराठवाडा कायमच विकास प्रक्रियेत अग्रस्थानी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दृकश्राव्य संदेश दाखवण्यात आला. यात उपमुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा हा कायमच शासनाच्या विकास प्रक्रियेत अग्रस्थानी राहिला असून हिंगोली येथे भारतरत्न नानाजी देशमुख कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहे. एकीकडे मराठवाड्यात सिंचन सुविधा, पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत तर दुसरीकडे या भागात मोठे उद्योग यावेत, त्यामाध्यमातून युवा पिढीला रोजगार मिळावा हाही प्रयत्न होत आहे. त्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली जात आहेत. या सर्व एकत्रित प्रयत्नातून उद्याच्या मराठवाड्याचे चित्र वेगळे असणार आहे.
रोजगार संधी आणि करिअर मार्गदर्शन हा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेऊन नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जात असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, नागपूर येथे आयोजित महारोजगार मेळाव्यात 10 हजार तरूणांना रोजगार मिळाला, या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेतूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत विभाग आणि जिल्हास्तरावर महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याचा व प्रत्येक मेळाव्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लातूर येथे आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात 16 हजाराहून अधिक युवक-युवतींनी नोंदणी केली असून 200 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या असल्याची माहिती मिळाल्याचे ते म्हणाले.
कौशल्य आणि रोजगार संधीसाठी नेटाने प्रयत्न- मंगल प्रभात लोढा
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, रोजगार मेळावे आयोजित करण्याची मूळ संकल्पना ही तत्कालीन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची होती. त्यांनी राज्यात रोजगार मेळावे, स्टार्टअपची कल्पना रुजवली आणि आपण ती पुढे नेत आहोत. नागपूर येथील रोजगार मेळाव्यानंतर आता लातूर येथे विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. राज्यभरातही ते आयोजित होतील. कौशल्य विकास आणि रोजगारासंबंधीच्या सर्व योजनांची माहिती येथे उभारण्यात आलेल्या स्टॉलमध्ये मिळेल. युवक-युवतींच्या कौशल्य विकास आणि रोजगाराचे काम, त्यांना रोजगार संधीची उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नेटाने केले जातील, अशी ग्वाही श्री. लोढा यांनी दिली.
लातूरच्या औद्योगिक विकासासाठी नमो महारोजगार मेळावा उपयुक्त – संजय बनसोडे
लातूरची ओळख पूर्वी व्यापारी शहर अशी होती, त्यानंतर सहकार चळवळीने जिल्हा ओळखला जावू लागला. आता शिक्षणातील लातूर पॅटर्न सर्वपरिचित आहे. राज्य शासनामार्फत लातूर येथे होत असलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामुळे लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लातूरच्या औद्योगिक विकासासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला. तसेच तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुद्रा योजना आणि उमेद अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त रेणुका कंबालवार यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करिअर दिंडीने कार्यक्रमाला प्रारंभ
विभागीय नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराची सुरुवात करिअर दिंडीने झाली. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी घोषणा देत आणि फलकाद्वारे करिअरविषयी संदेश दिला. यामध्ये करिअर मार्गदर्शन विषयक ग्रंथांची पालखी घेवून विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर कौशल्य ज्योत प्रज्वलित करून नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
००००