• Sat. Sep 21st, 2024

प्रतीक्षा संपली, ६ महिन्यांनी मृतदेहाचे अवशेष डब्यांमध्ये घरी, बघताच पत्नी-मुलांचा टाहो

प्रतीक्षा संपली, ६ महिन्यांनी मृतदेहाचे अवशेष डब्यांमध्ये घरी, बघताच पत्नी-मुलांचा टाहो

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: मागच्या ऑगस्ट महिन्यात घरून ट्रक घेऊन वरुडसाठी निघालेल्या मेहबूब खान यांचे तब्बल सहा महिन्यांची पार्थिवच घरी आले आणि तेही प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये. हे डबे घरी आणताच पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला आणि डब्यातील त्या अवशेषांचे अंत्यदर्शन घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहरातील कामगारनगर परिसरात राहणारे मेहबूब खान (वय ४७) हे ट्रक चालक होते. गेल्या ७ ऑगस्ट रोजी ते अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे ट्रक घेऊन माल आणण्यासाठी गेले होते. परतीच्यावेळी त्यांनी कुटुंबीयांना लगेच परतत असल्याचे सांगितले; मात्र, नंतर त्यांचा मोबाइल स्विच्ड ऑफ झाला होता. कुटुंबीयांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असण्याची तक्रार दिली. २० ऑगस्ट रोजी जुना काटोल रोडवरील एका नाल्यात मानवी सांगाडा आढळला होता. त्यावेळी पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी खान यांच्या कुटुंबीयांना बोलावले. तेथे कपडे आणि बेल्टवरून कुटुंबीयांनी हा मृतदेह मेहबूब खान यांचाच असल्याचे सांगितले होते. त्यावेळी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.

तपासात मेहबूब खान यांचा वरुड येथे खून झाल्याचे आढळल्याने वरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. ‘शवविच्छेदनानंतर तुम्हाला पार्थिव दिले जाईल’, असे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी ते मेयोत गेले असता मृतदेह शासकीय मेडिकलला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर डीएनए चाचणीसाठी हा मृतदेह न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. ‘१५ दिवसांनी या चाचणीचा अहवाल येईल व त्यानंतरच मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात येईल’, असे सांगण्यात आले.

त्याला सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही खान यांच्या कुटुंबीयाना अंत्यसंस्कारासाठी पार्थिव मिळत नव्हते. त्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या अल्पसंख्यक विभागाचे वसीम खान यांच्या नेतृत्वात मेहबूब खान यांच्या कुटुंबीयांनी पोलिस आयुक्त रवींद्र सिगंल यांची भेट घेऊन त्यांना हा सारा प्रकार सांगितला होता. पोलिस आयुक्त लगेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेत बोलल्यानंतर चाचणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून मेहबूब खान यांच्या शरीराचे अवशेष असलेल प्लास्टिकचे डबे पोलिसांमार्फत मेहबूब खान यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर वसीम खान यांच्यासहच पत्नी नूरजहाँ, मुले व अन्य नातेवाइकांच्या उस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed