कोणत्याही पक्षाच्या आधाराने लढलं, तर त्या पक्षांची बंधने येतात आणि बंधने असली की, गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
गरीब मराठ्यांचे आणि ओबीसींचे ताट वेगळे हवे, पक्षाच्या वतीने आम्ही भूमिका जाहीर केली आहे की, ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसं झालं तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळं असावं, अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेच्या निमित्ताने गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो, हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
ओबीसींमध्ये राजकीय जागृती झाली याबाबत मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली असे मी मानतो. आपल्या अधिकारांची लढाई असे स्वरूप आता येत आहे आणि भाजपची धार्मिक विचारधारा गळून पडत आहे असे आम्ही मानत असल्याचेही त्यांनी सांगितले.
…ते काँग्रेसवालेच सांगू शकतील
पत्रकारांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचाराला असता आंबेडकरांनी म्हटले की, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये का गेले? याचं उत्तर काँग्रेसवाल्यांनीच द्यायला पाहिजे. इतर कोणीच यावर उत्तर देऊ शकत नाही असे मला वाटते.
