मुंबई, दि. १३ : सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील पुढील सरळसेवेची पदे भरण्यात येणार आहेत. कल्याण संघटक-४०, वसतिगृह अधीक्षक-१७, कवायत प्रशिक्षक-०१, शारीरिक प्रशिक्षण निदेशक-०१, तर गट “क” या पदाकरीता फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून व वसतिगृह अधीक्षिका, गट-क-०३ या पदाकरीता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांपैकी ०१ पद हे अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्वाच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहे.
ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्या मार्फत होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड (Web-based) ऑन लाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर Recruitment Tab येथे ३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होणार असल्याचे सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
राजू धोत्रे/विसंअ/