• Mon. Jun 8th, 2026
    मी कोणता निर्णय घ्यावा? आता याला फार उशीर झालाय, पंकजांच्या मनात नेमकं काय?

    बीड: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात गाव चलो अभियान राबविले जात आहे. याच अभियानांतर्गत पंकजा मुंडेंनी बीड तालुक्यातील नारायण गड येथे नगद नारायणाचे दर्शन घेऊन अभियानाची सुरुवात केली. त्यानंतर पौंडूळ गावात पंकजा मुंडेंनी रात्रीचा मुक्काम केला. मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती पंकजा मुंडे यांनी घेतली आहे.

    माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान पंकजा मुंडेंनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, ”राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत माझं नाव चर्चेत होतं किंवा आहे यात नाविन्य असं काही नाही. लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना जिथे पाहिजे तिथे मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे.”

    जशीही राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणूक येते, तेव्हा पंकजा मुंडे यांचं नाव कायम चर्चेत असतं. यावेळी महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या ६ जागांच्या निवडणुकीवेळी पंकजांचं नाव चर्चेत आहे. याच अनुषंगाने त्यांना माध्यमांनी सवाल केला. राज्यसभेच्या खासदारीच्या संदर्भात मागच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. तुम्हाला लोकसभेत जायला आवडेल की राज्यसभेत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, ”मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाहीये. सध्या मला कुठे जायला आवडेल या पर्यायाला विलंब झाला आहे. जे लोकं माझ्यावर प्रेम करतात. त्यांना मला कुठे पाहायला आवडेल? हे महत्त्वाचं आहे” असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

    दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंना खांद्याला दुखापत झाली होती. विश्रांतीनंतर आज पहिल्यांदाच पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात दाखल झाल्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या प्रकृतीबाबत सांगितले. ”लोकांमध्ये आल्यावर मी कधीच माझं दुःख दाखवून देत नाही. ब्रीच कँडी रुग्णालयात एम.आर.आय केला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फिजिओथेरपी झाली आहे. तीन आठवड्यानंतर प्रकृती ठीक झाली नाही. तर मात्र सर्जरी करावी लागेल”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed