• Tue. Nov 26th, 2024

    आयफा फिल्म फेस्टीवलच्या धर्तीवर आता मराठी चित्रपट उत्सव – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    ByMH LIVE NEWS

    Feb 11, 2024
    आयफा फिल्म फेस्टीवलच्या धर्तीवर आता मराठी चित्रपट उत्सव – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

    फिल्मसिटीच्या बाहेर महाराष्ट्रात आता नि:शुल्क शुटींग

    चंद्रपूर, दि. ११ : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्याच्या कथानकामध्ये एक अद्भूत शक्ती असते. डॉक्टरपेक्षा चित्रपटाच्या डायरेक्टरचा हात प्रेक्षकांच्या थेट हृदयापर्यंत पोहचतो. अशी चित्रपटसृष्टी राज्यात टिकली पाहिजे, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून फिल्म फेस्टीवलच्या धर्तीवर आता भव्यदिव्य मराठी चित्रपट उत्सव सुरू करणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    चंद्रपूर येथील मिराज सिनेमा येथे दुसऱ्या चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रसिद्ध दिग्दर्शक तथा पुणे फिल्म फेस्टीवलचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्हाधिकारी विनय गौडा, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रसिध्द दिग्दर्शक समर नखाते, वल्ली चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाडेकर यांच्यासह हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते.

    भाषेपूर्वी अभिनयातून संवाद साधला जात होता, असे सांगून मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले,  1913 मध्ये आलेला ‘राजा हरीशचंद्र’ हा चित्रपट मूकपट होता. अभिनयातून तो प्रेक्षकांना कळला. 1932 मध्ये ‘अयोध्येचा राजा’ हा चित्रपट आला. वैशिष्ट म्हणजे अयोध्येशी चंद्रपूरचे एक वेगळे नाते तयार झाले आहे. प्रभु रामाच्या मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे सागवान गेले असून कुठल्याही भाविकाला अयोध्या येथे दर्शनासाठी चंद्रपूरच्या लाकडाच्या दरवाज्यातूनच जावे लागेल, असा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.

    पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्राचे वर्णन हे ‘चांदा ते बांदा’ असे केले जाते. त्यामुळे गत दोन वर्षापासून फिल्म फेस्टिवल चंद्रपूरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्हा हा खनीज आणि कोळसाकरीता प्रसिध्द आहे. कोळसा खाणीत हिरा सापडतो तसे चंद्रपूरमध्ये अभिनयातील कोहीनूर आहेत. जयंत सोमलकर, ‘एका रात्रीचा पाऊस’ या चित्रपटाच्या निर्मात्या प्रतिष्ठा ताई ह्या चंद्रपूरच्या आहेत. आपल्या जिल्ह्यात कलाकारांची कमी नाही, त्यांना संधी मिळवून दिली तर नक्कीच ते संधीचे सोने करतील, त्यासाठीच चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल घेण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून येथील कलाकार प्रेरणा घेऊन अभिनय, दिग्दर्शन, निर्माता या क्षेत्रात आपला ठसा उमटवतील. येथील कलाकाराला राष्ट्रीय फिल्म फेअर अवार्ड मिळावा व चंद्रपूरची शान जगामध्ये वाढावी, असा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    सुधीरभाऊंनी जागतिक सिनेमा चंद्रपुरात आणला : दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल

    चंद्रपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलचे हे दुसरे वर्ष आहे. चंद्रपूर आणि आजुबाजूच्या परिसरात चित्रपटाच्या शुटींगकरीता लागणारे सुंदर लोकेशन आहे. येथेही अभिनेते आणि दिग्दर्शक घडावे, याासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जागतिक सिनेमा चंद्रपुरात आणला, असे गौरवोद्गार प्रसिध्द दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले.

     

    पुढे ते म्हणाले, जगातील सामाजिक आशय आजचा तरुण टिपत आहे. समाजामध्ये शांततेचा संदेश देण्यासाठी यावर्षी पांढरे कबुतर हे चित्रपट महोत्सवाचे बोधचिन्ह ठेवले आहे. मुंबईबाहेर चंद्रपूर, लातूर, औरंगाबाद येथेही पुणे फिल्म फेस्टीवलचे आयोजन होत आहे.  या तीन दिवसात चंद्रपूरकरांसाठी उत्कृष्ट चित्रपटांची मेजवानी पालकमंत्री सुधीरभाऊंनी उपलब्ध करून दिली आहे, याचा प्रेक्षकांनी लाभ घ्यावा. कारण सुधीरभाऊंमध्ये उत्कृष्ट रसिकता असल्यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही डॉ. जब्बार पटेल म्हणाले.

    मुंबईच्या फिल्मसीटी बाहेर चित्रपटाची शुटींग नि:शुल्क : मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर ‘वन विंडो सिस्टीम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शुटींगसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

    75 नाट्यमंदिराची निर्मिती: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तसेच नाट्य परिषदेचे हे 100 वे वर्ष असल्यामुळे राज्यात 75 नाट्यमंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 9 कोटी 33 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे.

    फिल्मसिटीत सर्व सुविधा उपलब्ध होणार : मुंबई येथील फिल्मसिटी 521 एकरमध्ये आहे. तसेच त्यालगत 104 चौ. किमी. मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या ठिकाणी चित्रपटासाठी लागणा-या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    मान्यवरांचा सत्कार : यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रसिध्द दिग्दर्शक समर नखाते, वल्ली या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक मनोज शिंदे, अभिनेता देवा गाडेकर, मिराज सिनेमाचे रौनक चोरडीया यांचा सत्कार करण्यात आला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed