मुंबई, दि. ६ : रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेपैकी सतरा गुंठे जागा ही ऐतिहासिक महत्व असलेल्या थिबाराजा कालीन बुद्ध विहाराच्या स्मारक कामासाठी जिल्हाधिकारी यांना हस्तांतरीत करण्याची कार्यवाही विभागाने करावी, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिल्या.
थिबाराजा कालीन बुध्द विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट, ता.जि.रत्नागिरी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जागेची मागणी केल्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री श्री. देसाई यांनी संबंधितांना सूचना दिल्या. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, स्मारक समिती सदस्य, राज्य उत्पादन आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री.देसाई यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक बौद्ध कालीन विहाराबाबत स्मारक समितीच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच स्थानिक जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांकडून तेथील जागेसंदर्भातील सद्यंस्थितीची माहिती घेतली. या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाकडे असलेल्या तीन एकर जागेपैकी बौद्ध विहार स्मारकासाठी सतरा गुंठे जागा मिळण्याच्या प्रस्तावावर समंती दर्शवत मंत्री श्री.देसाई यांनी स्मारक समितीने मागणी केल्याप्रमाणे सतरा गुंठे जागा जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला दिल्या. बौद्ध विहार स्मारकासाठी सदरील जागा देण्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाची मान्यता असून त्या जागेचा या कामा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी वापर करण्यात येऊ नये. बौद्ध विहाराच्या स्मारक कामासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.
००००
वंदना थोरात/विसंअ