काय आहे प्रकार ?
ताडदेव येथील आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या साने गुरूजी मार्गालगत जरीवाला बिल्डींग आहे. गेल्या आठवड्यापासून या इमारतीमध्ये विचित्र प्रकार सुरू झाले. सुरूवातीला सात ते आठ घरांच्या दरवाजाच्या कड्या बाहेरून लावण्यात आल्या. कुणीतरी खोडसाळपणा केला असेल असा विचार करून नागरिकांनी दुर्लक्ष केले. परंतु दुसऱ्या रात्रीही हेच घडले. यावेळी तर कडी लावल्यानंतर दरवाजा ठोठावण्यात आले, बेल वाजविण्यात आल्या. उत्सुकता म्हणून एका घरातील दोन तरूणांनी दरवाज्याच्या होलमधून नजर टाकली. त्यावेळी दोन तरूणी झटक्यात गायब झाल्याचे दिसल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱ्या रात्री लिंबू-मिरची कापून ठेवण्यात आली. रोजच्या या प्रकारांमुळे अनेक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण झाले.
तीन ते चार रात्री हे प्रकार सुरू होते. पोलिसांत जाण्याचा किंवा सीसीटीव्ही बसविण्याचा रहिवाशांचा विचार सुरू असतानाच हे प्रकार बंद झाले. चार ते पाच रात्रीत काहीच घडले नाही आणि पुन्हा रविवारी रात्रीपासून हेच प्रकार पुन्हा सुरू झाले. रविवारी रात्री तर रंगीत रांगोळी घालत त्यावर लिंबू कापून सोबत मिरच्या ठेवण्यात आल्या. रहिवाशांनी ही बाब बिल्डींग मालकाच्या निदर्शनास आणून दिली आहे. जागे राहून काहीच फायदा होत नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार आणि सीसीटीव्ही बसविणे हे दोनच पर्याय असल्याचे येथील रहिवाशांनी म्हटले आहे. दरम्यान या विचित्र प्रकारांची संपूर्ण ताडदेवमध्ये चर्चा रंगली आहे.
‘त्या’ तरूणी तर नाहीत ना?
काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर मुंबईतील एका सोसायटीमध्ये दोन तरूणी दरवाजा बाहेरून बंद करून बेल वाजवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले होते. घाबरविण्याच्या उद्देशाने या तरूणींनी आपल्या चेहऱ्यासमोर केस सोडल्याचे यात दिसत होते. काही वृत्तवाहिन्यांनी हा व्हायरल व्हिडीओ बातम्यांमधून दाखवला होता. त्यानंतर दोन दिवसांनी येथील एका रहिवाशाने ‘एक्स’वर त्या दोन तरूणी सापडल्याचे कळविले. दोघींनी माफी मागितल्याने पोलिस तक्रार केली नसल्याचे त्याने नमूद केले होते.