पुणे बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केâट यार्डात रविवारी फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. गुलटेकडीतील मार्केट यार्डात राज्यातून आणि परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे आठ ते १० टेम्पो, कर्नाटक, गुजरातमधून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून शेवगा तीन ते चार टेम्पो, राजस्थानातून गाजर ११ ते १२ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा तीन ते चार टेम्पो, भुईमुगाच्या शेंगा दोन टेम्पो, मध्य प्रदेश, राजस्थान येथून मटार १५ ते १६ ट्रक, कर्नाटक येथून पावटा दोन ते तीन टेम्पो, मध्य प्रदेशातून लसणाची पाच ते सहा टेम्पोंची आवक झाली.
‘स्थानिक भागातून सातारी आल्याची ६०० ते ७०० गोण्या, भेंडी पाच ते सहा टेम्पो, गवार दोन ते तीन टेम्पो, टोमॅटो आठ ते नऊ हजार क्रेट, हिरवी मिरची पाच ते सहा टेम्पो, काकडी सात ते आठ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी पाच ते सहा टेम्पो, शिमला मिरची आठ ते दहा टेम्पो, पावटा चार ते पाच टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, शेवगा दोन ते तीन टेम्पो, घेवडा पाच ते सहा टेम्पो, कांदा १०० ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागांतून बटाट्याची ५० टेम्पोंची आवक झाली,’ अशी माहिती ज्येष्ठ आडते विलास भुजबळ यांनी दिली.
पालेभाज्यांच्या दरात घसरण
बाजारात बहुतांश पालेभाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. कोथिंबीर, मेथी, चाकवत, करडई, पुदिना, अंबाडी, मुळा, राजगिरा, चुका, पालक आणि हरभरा या भाज्या स्वस्त झाल्या आहेत. शेपू महागला असून, कांदापात आणि चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़ कोथिंबिरीची दोन लाख जुडी, मेथीची सव्वालाख जुडी, हरभरा चार ते पाच हजार गड्डी इतकी आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबीर सहा रुपये, चाकवत आणि करडईच्या दरात प्रत्येकी एक रुपया, मेथी, अंबाडी, मुळा, राजगिरा, चुका आणि हरभरा गड्डीच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांची घट झाली. शेपूच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे.
फळे महागली
डाळिंब, लिंबू, सीताफळ, खरबूज, कलिंगड आणि पपई या फळांना मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. अननस, बोरे, संत्री, मोसंबी, पेरू आणि चिक्कूचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. केरळ येथून अननस सात ट्रक, मोसंबी ५५ ते ६० टन, संत्री ३० ते ३५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबाची एक हजार ते १३०० गोणी, कलिंगड आठ ते १० टेम्पो, खरबूज आठ ते १० टेम्पो, सीताफळ चार ते पाच टन, चिक्कूच्या दोन हजार खोक्यांची आवक झाली.
फुलांचे दर कोसळले
फुलबाजारात आवक साधारण होती. मात्र, मागणीअभावी फुलांचे दर कोसळले आहेत. झेंडूची आवक जास्त असल्याने दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांचे प्रति किलोचे दर (रुपयांत)
झेंडू : ३०-५०, गुलछडी : १५०-१७०, अॅश्टर जुडी : १०-१४, अॅश्टर सुट्टे : ५०-८०, कापरी : ३०-६०, शेवंती : ५०-८०, (गड्डीचे भाव), गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : १८०-२५०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : ६०-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिली (१० काड्या) ८००-१०००, ऑर्किड : ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, जिप्सोफिला : २००-२५० रुपये.
अंडी महागली
‘गणेश पेठ येथील बाजारात मासळीच्या भावातील तेजी कायम आहे. मागणी वाढल्याने इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. गावरान अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ४० ते ५० रुपयांनी घसरण झाली आहे. चिकन व मटणाचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते. गणेशपेठ मासळी बाजारात सर्व प्रकारच्या मासळीच्या दरांत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात खोल समुद्रातील मासळी १० ते १५ टन, खाडीची मासळी १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची ५०० ते ७०० किलोची आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनचीही सुमारे १५ ते २० टनांची आवक झाली,’ अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली.