मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते. त्यावेळी शिर्डीमधील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिर्डी लोकसभा मतदारसंघात मनसेने उमेदवारी करावी, अशी मागणी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उमेदवारी केल्यास आम्ही एकदिलाने काम करू आणि विजय खेचून आणू, असेही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना सांगितले.
राज ठाकरे यांना तसे निवेदन देत पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला. यानंतर राज ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते कसे काम करत आहेत, याचा आढावा घेतला. सकारात्मक चर्चा झाल्याचे मनसेचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, दत्तात्रय कोते यांनी सांगितले.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा नगर जिल्ह्यात चांगला संपर्क आहे. स्वच्छ प्रतिमा, मनसेची काम करण्याची आक्रमक स्टाईल आणि राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्यास शिर्डी मतदारसंघात नक्कीच परिवर्तन होईल, असा दावा शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिल्यास त्यांना विजय मिळवून देण्याचे काम नक्की करू, अशी ग्वाही देखील कार्यकर्त्यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारांची मागणी करताच सत्ताधारी शिवसेना शिंदे गट सावध झाला आहे. तसेच महाविकास आघाडी देखील अलर्ट झाली आहे. मनसेने येथे उमेदवार दिल्यास काय परिणाम होईल, याची खातरजमा वरिष्ठ नेत्यांकडून केली जात आहे. विशेष करून शिवसेना ठाकरे गटाकडून माहिती घेतली जात आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिवसेना फुटीनंतर शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघबाबत शिवसेना ठाकरे गट काय निर्णय घेतो, याकडे लक्ष लागले आहे. सध्या रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले देखील आज शिर्डीत असून तेदेखील तयारीला लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगामी काळात काय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News