• Sat. Sep 21st, 2024

जोगेश्वरी- विक्रोळी मेट्रोबाबत नवी अपडेट, आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? जाणून घ्या

जोगेश्वरी- विक्रोळी मेट्रोबाबत नवी अपडेट, आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार? जाणून घ्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: जोगेश्वरी-विक्रोळी या मेट्रो ६ साठी आणखी दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. या मार्गिकेतील विद्युतीकरणाची तयारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे. मात्र ती यंत्रणा उभी करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

मेट्रो ६ ही जोगेश्वरीच्या स्वामी समर्थनगर ते विक्रोळी येथील पूर्व द्रुतगती महामार्गादरम्यान असलेली १५.३१ किमी लांबीची उन्नत मार्गिका आहे. या मार्गिकेचे बांधकाम ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवर १३ स्थानके असतील. या १३ स्थानकांना जोडण्यासाठी एकूण ७६९ खांबांची उभारणी होत आहे. त्याआधारे मार्गिका उभी झाल्यानंतर त्यावरून मेट्रो धावण्यासाठी विद्युतीकरण अत्यावश्यक आहे. या विद्युतीकरणासाठी ‘एमएमआरडीए’ने निविदा काढली आहे. त्यासाठी ७३४.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हवालामार्फत चालायचं फंडिंग; ISIS प्रकरणात नाशिकच्या संशयिताला ६ दिवस कोठडी, काय आहे प्रकरण?

या निविदेनुसार, संबंधित कंत्राटदाराला विद्युतीकरणासाठी आवश्यक असलेला आराखडा तयार करणे, सामग्री तयार करून त्याची उभारणी करणे, चाचणी व संपूर्ण विद्युतीकरण यशस्वीरित्या पूर्ण करून वीजप्रवाह सुरू करणे, ही कामे करायची आहेत. त्याखेरीज मार्गिकेतील स्थानकांसाठीचे उद्‌वाहन व सरकत्या जिन्यांसाठीही वीजप्रवाह द्यायचा आहे. ही यंत्रणा १०४ आठवड्यांत उभी करून त्याची १५ वर्षे देखभाल करणे तसेच दोन वर्षांचा त्रुटी कालावधी असेल. निविदा भरण्याची अखेरची तारीख १५ मार्च आहे.

या मार्गिकेचे कारशेड (गाड्या दुरुस्ती डेपो) हे कांजुर येथील जमिनीवर उभे होत आहे. मार्गिकेला वीजप्रवाह देणाऱ्या कंत्राटदारालाच कांजुरच्या या कारशेडलाही वीजप्रवाह व लिलोआधारित (लाइन इन लाइन आऊट) वाहिनीद्वारे जोडणी द्यायची आहे. यामुळे मार्गिका व कारशेडसाठीचे विद्युतीकरण एकत्रितपणे पुढील १०४ आठवड्यांत पूर्ण होऊ शकणार आहे.

१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नवी मुंबई मेट्रो सेवेत, बेलापूर ते पेंधर पहिली मेट्रो रवाना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed