• Sat. Sep 21st, 2024
मराठा समाज सर्वेक्षण सुरू; पहिल्याच दिवशी तांत्रिक अडथळा, अॅपमध्ये देहू, इंदापूरचा समावेश नाही

पुणे: राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरात सर्वेक्षण सुरू झाले असले तरी पहिल्याच दिवशी सॉफ्टवेअर मंदगतीने कार्यान्वित झाल्याने तांत्रिक अडथळ्याला सामोरे जावे लागले. तर गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अॅपमध्ये पुणे जिल्ह्यातील देहू आणि इंदापूर नगरपालिका कार्यक्षेत्रांचा समावेशच केला नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली. जिल्हा प्रशासनाने आयोगाला याची माहिती कळविली असून या दोन नगरपालिकांचा समावेश केल्यानंतर अॅपद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.
भाजपने शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे आणि फडणवीसांना संपवलं, योगीजी जरा जपून राहा : उद्धव ठाकरे
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आर्थिक, सामाजिक तसेच शैक्षणिक निकष निश्चित केले आहेत. त्यासाठी सुमारे १८१ प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अॅपच्या माध्यमातून सर्वेक्षण मंगळवारी सुरू झाले. सर्वेक्षणाच्या पहिल्याच दिवशी अॅपमध्ये देहू आणि इंदापूर या दोन नगरपालिका नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे तेथील प्रगणकांना त्या शहरांमधील सर्वेक्षण करता आले नाहीत. परिणामी, पहिल्या दिवशी त्या ठिकाणचे सर्वेक्षण होऊ शकले नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रगणकांनी जिल्हा प्रशासनाला माहिती कळविली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने यासंदर्भातील माहिती गोखले इन्स्टिट्यूट तसेच मागासवर्ग आयोगाला कळवून अपमध्ये दोन नगरपालिकांचा समावेश करण्याची सूचना केल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

रश्मी ठाकरेंना समोर बसलेले पाहिलं की माँसाहेब आठवतात, भास्कर जाधव भर सभेत तोंडभरुन बोलले

सर्वेक्षणाच्या पहिल्या दिवशी अनेक प्रगणकांना सर्व्हरबाबत अडचणींना सामोरे जावे लागले. प्रगणकांच्या मोबाईलमध्ये सर्वेक्षणाचे अॅप डाऊनलोड करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सर्वेक्षण करताना सर्व्हर मंदगतीने सुरू असल्याचे दिसून आले. तसेच एका घरात अॅपद्वारे माहिती भरण्यासाठी सुमारे २० ते २५ मिनिटांचा वेळ लागत असल्याचे प्रगणकांनी सांगितले. दरम्यान याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी अपमध्ये तांत्रिक अडथळे आले असून ते दूर केले जातील. तसेच मुदतीत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed