नागपूर मेट्रो रिजनमध्ये हिंगणा, मौदा, कामठी, नागपूर ग्रामीण, पारशिवनी हे पूर्ण तालुके आणि कुही, उमरेड, कळमेश्वर आणि सावनेर या तालुक्यांतील काही गावांचा समावेश आहे. ३१ डिसेंबर २०२०पर्यंतचे अवैध भूखंड आणि घरे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यात येत आहेत. आतापर्यंत ८५ हजार ६८२ ऑनलाइन अर्ज एनएमआरडीएकडे प्राप्त झाले आहेत. येत्या ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत आहे, असे एनएमआरडीएकडून सांगण्यात आले. वैध कागदपत्रे व इतर नियमांची पूर्तता करण्याच्या अटीवर १ जून २०२३पासून ही प्रक्रिया सुरू झाली. एनएमआरडीएच्या www.nmrda.org या संकेतस्थळावर अर्ज पाठविण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली.
शनिवार, रविवारी सुविधा
एनएमआरडीएच्या विभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी आणि रविवारी हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करताना अर्जासोबत भूखंडाचे विक्रीपत्र, आखिव पत्रिका, अभिन्यासाचा नकाशा, बांधकामाचा नकाशा, रहिवासी पुरावा आदी मालकीहक्काचे कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असल्याचे एनएमआरडीएकडून सांगण्यात आले. एनएमआरडीच्या विभागीय कार्यालयात कागदपत्रे सादर केल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येईल. ले-आउटनुसार अर्जांची छाननी होईल. भूमीअभिलेख विभागाकडून मोजणी करण्यात येईल. नियमात बसणाऱ्यांना भूखंड किंवा घरांची नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन डिमांड पाठविण्यात येईल, असे एनएमआरडीएकडून सांगण्यात आले.
असे प्राप्त झाले अर्ज
तालुका : अर्जांची संख्या
उमरेड : १,६७४
सावनेर : २,१०२
पारशिवनी : ३९३
नागपूर ग्रामीण : ५०,६२६
मौदा : १५४
कुही : २२८
कामठी : २१,४६४
कळमेश्वर : ६९०
हिंगणा : ८,३५१