…तर झाले असे, न्यायालयीन कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरणारे अॅड. सचिन आडकर बुधवारी म्हाडा कार्यालयातील कायदा विभागात गेले होते. आपले काम आटोपून बाहेर आल्यानंतर त्यांना पोलिसांची टोइंग व्हॅन दिसली. तिच्या पुढील भागात चालकासह वाहतूक पोलिस बसले होते. अर्थात, या चालकाने सीट बेल्ट लावला नव्हता. अॅड. आडकर यांनी संबंधित पोलिसाला याबाबत विचारणा केली असता, ‘वारंवार उतरावे लागते म्हणून बेल्ट लावला जात नाही’, असे थातूरमातूर उत्तर त्याने दिले. मात्र, काहीही असले तरी हा नियमभंग असल्याने आपण त्याला दंड आकारावा, अशी विनंती अॅड. आडकर यांनी संबंधित पोलिसाला केली. अन्यथा, विनासीट बेल्टचे छायाचित्र पोलिस आयुक्त कार्यालयाला ‘एक्स’ करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यावर अॅड. आडकर यांचा परिचय विचारण्यात आला. ते पेशाने वकील असल्याचे समजताच, व्हॅनमधील पोलिस कर्मचारी बाहेर आला व त्याने सीट बेल्ट न लावलेल्या त्यांच्याच वापराच्या टोइंग व्हॅनच्या चालकाला चक्क २०० रुपये दंड आकारला.
‘कोणतेही कायदे किंवा नियम हे केवळ सर्वसामान्य नागरिकांसाठीच नसतात. आपणही त्यांचे पालन करण्यास बांधील आहोत, याचा संबंधित यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना अनेकदा विसर पडतो व याचीच आठवण करून देण्याचा मी दक्ष नागरिक म्हणून केला’, असे अॅड. आडकर यांनी सांगितले. ‘टोइंग व्हॅनच्या चालकाने गणवेशासह गळ्यात ओळखपत्र घालणे आवश्यक आहे. तसेच गाडीच्या दर्शनी भागात काचेवर ‘पीयूसी’ प्रमाणपत्र लावायला हवे. याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट आणि इन्शुरन्सची कॉपी सोबत ठेवणे गरजेचे आहे. परंतु पोलिसांच्या वापराच्या अशा गाड्यांची फारशी तपासणी होत नाही. परिणामी संबंधित कर्मचारीही त्याकडे दुर्लक्ष करतात. वाहतुकीचे नियम हे पोलिस आणि सर्वसामान्य वाहनचालकांचा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व अपघात टाळण्यासाठी आहेत. त्यामुळे सर्वांकडून त्यांचे काटेकोर पालन व्हायला हवे’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दोन महिन्यांपूर्वीही असाच प्रसंग
दोन महिन्यांपूर्वीही वांद्रे न्यायालयाबाहेर अशाच पद्धतीने नियम मोडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अॅड. आडकर यांनी त्याची चूक लक्षात आणून दिली होती. टोइंग व्हॅनवरील अंमलदार, प्रभारी अधिकारी, चालक किंवा अन्य कर्मचाऱ्यांकडून अटी व शर्तींचे उल्लंघन होत असल्यास सामान्य नागरिक अशाचप्रकारे पुराव्यासह संबंधित हद्दीतील वाहतूक पोलिस कार्यालयात तक्रार करू शकतात’, असे त्यांनी नमूद केले.