परभणी जिल्ह्यात एकूण सात साखर कारखाने आहेत. दरवर्षी हे साखर कारखाने आपल्या परीने शेतकऱ्यांच्या उसाला वेगवेगळ्या परीने भाव देत होते. काही साखर कारखाने २,२०० तर काही २,४०० तर काही २,५०० असा वेगवेगळ्या भाव देत होते. त्यामुळे मागील वर्षभरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ही ऊसाला सत्तावीसशे रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी साखर कारखानदाराच्या विरोधात आंदोलन करीत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २,७०० रुपये ऊसाला भाव मिळावा ही मागणी घेऊन त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते.
पाच साखर कारखान्यांनी २७ रुपये भाव देऊ, असे जाहीर केले पण उर्वरित दोन कारखाने मानायला तयार नव्हते. त्यामुळे आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात परभणी गंगाखेड महामार्गावरील सिंगणापूर फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी बारा वाजता सुरू झालेले हे रास्ता रोको आंदोलन दोन तास चालले. या आंदोलनादरम्यान त्या दोन साखर कारखान्याचे प्रतिनिधी माजी खासदार राजू शेट्टी यांना भेटले आणि त्यांच्या बैठकीमध्ये शेवटी तोडगा काढण्यात आला. त्या दोन्ही साखर कारखान्यांनी २७ रुपये भाव देऊ अशी हमी देखील दिली आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
शेतकऱ्यांनी गुलाल उधळून केला आनंदोत्सव साजरा
तब्बल दोन तास चाललेल्या आंदोलनादरम्यान साखर कारखानदारांनी २७ रुपये भाव देण्याचे जाहीर केले. त्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसमक्ष आपली भूमिका मांडली आणि साखर कारखानदारांनी घेतलेला निर्णय देखील सांगितला. आंदोलनाला यश आल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६४ कोटी रुपये वाढवून मिळणार
परभणी जिल्ह्यामध्ये यावर्षी ३२ लाख टन उसाचे गाळप होणार आहे. या सातही साखर कारखान्यांनी २७ रुपये भाव जाहीर केल्यामुळे आता शेतकऱ्यांना वाढीव ६४ कोटी रुपये भावाच्या रूपाने मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी या प्रश्नावर एक जोड दाखवल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. भविष्यातही शेतकऱ्यांनी अशीच एकजूट दाखवली तर शेतकऱ्यांना आपले प्रश्न सोडवून घेण्यास सुलभ होईल असेही माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.