• Sat. Sep 21st, 2024

‘अँटिबायोटिक्स’चा अतिवापर टाळा, करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सच्या सूचना

‘अँटिबायोटिक्स’चा अतिवापर टाळा, करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने टास्क फोर्सच्या सूचना

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यात सर्दी, ताप, खोकल्यासह करोना विषाणूचा नवीन उपप्रकार ‘जेएन १’ विषाणूचा संसर्ग वाढत आहे. मात्र, सरसकट सर्व रुग्णांना’अँटिबायोटिक्स’ औषधे देण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य करोना टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे. सहव्याधी आणि पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या रुग्णांनाच अँटिबायोटिक्स औषधे द्यावीत, अशा सूचनाही टास्क फोर्सने राज्यातील सर्व डॉक्टरांना दिल्या आहे.

नव्याने आढळून येणाऱ्या करोना रुग्णांच्या सरसकट रक्ताच्या तपासण्या करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्यात. पूर्वी करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह अंत्यविधीसाठी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाला देण्यात येत होता. मात्र, आता करोनाच्या नवीन विषाणूमुळे रुग्णाचा मृत्यू झाला, तर मृतदेह रुग्णाच्या नातेवाइकांकडे द्यावा, सध्याच्या थंडीच्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकला या प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे; तसेच ‘सारी’ आणि ‘जेएन १’ या विषाणूचेही रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप याबरोबरच दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे या प्रकारची लक्षणे असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

टास्क फोर्सच्या सूचना…

– ताप, सर्दी, खोकला ही प्राथमिक लक्षणे असू शकतात.

– सहव्याधी नसलेल्या रुग्णांना अँटिव्हायरल औषधे देऊ नये.

– सर्व रुग्णांना अँटिबायोटिक्स देऊ नये.

– सर्व रुग्णांना ‘एचआरसीटी स्कॅन’ करण्याची गरज नाही.

– ‘सारी’च्या रुग्णांना ‘एचआरसीटी स्कॅन’ करता येईल मात्र, वारंवार करू नये.

– सर्व रुग्णांना ‘स्टेरॉइड’ देऊ नये.

– डिस्चार्ज देताना ‘आरटीपीसीआर’ टेस्ट करण्याची आवश्यकता नाही.

– सहव्याधी असलेल्या रुग्णांना तीन दिवसांकरीता ‘रेमडेसिव्हिर’ द्यावे.

– ‘सारी’ आणि सहव्याधी रुग्णांना पाच दिवसांकरीता ‘रेमडेसिव्हिर’ द्यावे.

‘राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘जेएन १’च्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. ‘जेएन १’ हा विषाणू हवेतून पसरत असल्याने प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण जास्त आहे. राज्य टास्क फोर्सची नुकतीच बैठक घेण्यात आली असून, यामध्ये उपचारांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

– डॉ. रमण गंगाखेडकर, अध्यक्ष, करोना टास्क फोर्स

कोरोनाच्या नव्या जेएन-१ व्हेरियंट धास्ती वाढली; मुख्यमंत्री शिंदेंकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed