• Sat. Sep 21st, 2024
‘सुंदर शाळा’ मुंबईतही; या शाळांना २१ लाखांचे बक्षिस जिंकण्याची सुवर्णसंधी, कुठे कराल नोंदणी?

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे राज्यात सुरू झालेले अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान मुंबईतही राबवले जाणार आहे. पालिका प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच खासगी अनुदानित-विनाअनुदानित शाळांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. या अभियानात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या शाळेला २१ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

या अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांचे गुणांकन करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन टप्पे ठेवण्यात आले आहेत. त्यात विद्यार्थी केंद्रीत उपक्रमाचे आयोजन व विद्यार्थ्यांचा सहभाग यासाठी एकूण ६० गुण असतील. तसेच शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग यासाठी एकूण ४० गुण असतील. अशाप्रकारे दोन्ही गट मिळून १०० गुण देण्यात येणार आहेत.

सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शाळेला २१ लाख रुपये, दुसरा क्रमांकाच्या शाळेला ११ लाख रुपये तर तिसरा क्रमांकावरील शाळेला ७ लाख रुपये अशी एकूण ३९ लाख रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहेत. या शाळांची निवड मूल्यांकन समितीद्वारे करण्यात येईल. पुरस्कार प्राप्त शाळा त्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन करतील. याबाबतचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस असतील.
राज्यात ३१ हजार रिअल इस्टेट एजंट अवैध; महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची माहिती
१५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

या अभियानात सहभागी होण्यासाठी पालिका, खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना निर्देश देण्यात आले आहेत. https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपक्रमाची कागदपत्रे स्कूल पोर्टलमध्ये अपलोड करावीत. अधिक माहितीकरिता व मार्गदर्शनासाठी या संकेतस्थळावर हेडमास्टर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आले आहे.१५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत शाळांनी संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed