• Sun. Sep 22nd, 2024
सर्वच आमदार पात्र कसे काय? हे समजून घ्यावं लागेल,नार्वेकरांच्या निकालावर भाजप आमदारांचं मत

धाराशिव : आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला असून विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे राज्यात तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा निकाल अपेक्षितच होता परंतु सर्वच आमदार पात्र कसे काय ? हा संशोधनाचा विषय असून पुढील दोन दिवसात याचे सविस्तर विश्लेषण समजून येईल, अशी प्रतिक्रिया तुळजापूरचे भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावर दिली आहे.

नेमके आमदार कोणाकडे जास्त होते ? पक्ष साधारण कोणाकडे जायला हवा, नैसर्गिक न्यायाचा विचार केला तर हा निकाल अपेक्षितच होता. एक बाब मला अजूनही समजली नाही. जरा विश्लेषण करावे लागेल की सगळेच पात्र कसे आहेत, हे थोडे समजून घ्यावे लागेल. निकाल पूर्ण समजणे शक्य झाले नाही, येत्या एक ते दोन दिवसा मध्ये त्याची स्पष्टता येईल, असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं.

एक गोष्ट आपण मान्य करायला हवी की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीमध्ये जो निकाल दिला होता.जी काही टिप्पणी केली होती, त्याच्यातले बारकावे मांडले गेले होते. ते आजच्या निकाला मध्ये मांडले आहेत. त्याच्या आधारावर हा निकाल दिला आहे, असंही राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.

शिवसेनेचे सर्व आमदार पात्र

शिवसेना ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या गटातील १६ आमदारांवर पहिल्या टप्प्यात तर उर्वरित आमदारांवर दुसऱ्या टप्प्यात अपात्रतेच्या याचिका सादर करण्यात आल्या होत्या. तर, दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीनं भरत गोगावले यांनी ठाकरे गटातील १४ आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिका विधानसभा अध्यक्षांकडे सादर केल्या होत्या. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल जाहीर करताना दोन्ही गटांकडून जारी करण्यात आलेल्या अपात्रता याचिका फेटाळून लावल्या. यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्याकडील ३९ आमदार अपात्रतेच्या कचाट्यातून सुटले. तर, ठाकरेंच्या बाजूनं असणारे १४ आमदार देखील यातून सुटले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed