• Mon. Nov 25th, 2024
    अपात्रतेच्या निकालाला उरले अवघे काही तास, विधानसभाध्यक्ष नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निकालास अवघे तीन दिवस उरले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमागचे कारण उघड झाले नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

    सर्वोच्च न्यायायलाच्या निर्देशांनुसार शिवसेना आमदार अपात्रप्रकरणी नार्वेकर यांनी १० जानेवारीपर्यंत निर्णय देणे अपेक्षित आहे. मात्र या निकालापूर्वीच नार्वेकर हे आजारी पडल्याने त्यावरून विरोधकांनी उलटसुलट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा अध्यक्षांचे आजारी पडणे हा संभाव्य राजकीय भूकंपाचा भाग असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. या पार्श्वभूमीवर नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या जात आहेत.

    शिंदे गटाच्या वकिलांचे प्रश्न, सुनील प्रभू अडखळले, ठाकरे गटाची सुनावणी अंतिम टप्प्यात

    नार्वेकर हे आजारी असूनही रविवारी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची भेट ठरलेली नव्हती. परंतु अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीच्या वेळी वर्षा बंगल्यावर केवळ मुख्यमंत्री आणि नार्वेकर हे दोघेच उपस्थित होते. अन्य कोणीही नेता यावेळी उपस्थित नव्हता. दोन्ही उपमुख्यमंत्रीही या बैठकीत नव्हते. त्यामुळे या भेटीची चर्चा राजकीय़ वर्तुळात रंगली होती.

    नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी

    … तर मुख्यमंत्रिपद अडचणीत

    शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल १० जानेवारी रोजी येणार आहे. नार्वेकर हेच यावर निर्णय देणार आहेत. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास त्यांचे मुख्यमंत्रिपद अडचणीत येऊ शकते व त्यातून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यापूर्वीच नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत प्रामुख्याने आमदारांच्या अपात्रतेबाबतच चर्चा झाल्याचे सांगितले जात असले, तरी नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र उघड झालेला नाही.

    माझ्या मतदारसंघातील जनतेवर आपण अन्याय करताय, भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्षांनाच नियम सांगितले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed