• Sat. Sep 21st, 2024

मुकम्मल गझल नहीं, महज एक मिसरा हूं! आईना-ए-गझलमध्ये शायरीची बरसात

मुकम्मल गझल नहीं, महज एक मिसरा हूं! आईना-ए-गझलमध्ये शायरीची बरसात

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मंचावर सात मराठी भाषक कलावंत आणि रचनाकार, मात्र काव्याची बरसात होत होती शायरीची अस्सल भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उर्दूमधून. कधी प्रेमाचा सांगावा घेऊन, कधी दर्दभरी दास्तान सांगत तर कधी ऐकणाऱ्याला अंतर्मुख करीत एकापाठोपाठ एक शेर आणि गझला सादर होत गेल्या. अवघ्या तासा-दोन तासात वेगवेगळ्या गझलांचाच स्वतंत्र पण रंगतदार पट आकारास आला. उर्दूची नजाकत रसिकांच्या मनात घर करून गेली.

निमित्त होते ‘आईना-ए-गझल’कार डॉ. विनय वाईकर यांच्या स्मृतिनिमित्त वाईकर परिवार आणि सप्तक संस्थेच्यावतीने आयोजित ‘मुशायरा-आईना-ए-गझल’ या कार्यक्रमाचे. गायत्रीनगर येथील पर्सिस्टंट सिस्टिम्सच्या कविकुलगुरू कालिदास सभागृहात हा मुशायरा झाला. प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर आणि कवी वैभव जोशी यांच्यासह क्रांती साडेकर ‘रुह’, सुधीर बल्लेवार ‘मलंग’, एजाज शेख, दीपक मोहळे आणि अनंत नांदूरकर ‘खल‍िश’ यांनी उपस्थित रसिकांना अर्थगर्भ आणि उर्दू शायरीचा प्रत्यय दिला.

‘मुकम्मल गझल नहीं, महज एक मि‍सरा हूं मैं, सुना है एक सुखन्वर मेरी तलाश में’ या शेरापासून सचिन यांनी या मैफलीला प्रारंभ केला. त्यांच्या तोडीस तोड प्रारंभ करीत वैभव जोशी यांनी ‘सितारे चांद और सूरज, मैं सबकी बात करता हूं, नही पिता मगर फिर भी, तलब की बात करता हूं’ यासारख्या ओळी सादर करीत रसिकांची दाद मिळवली. ‘आहिस्तां आहिस्तां आना हमसे म‍िलने ख्वाबों में, वरना जालीम लोग कहेंगे ऐसी भी क्‍या जल्‍दी है’ किंवा ‘इत्ता कायको जल रहा भै, पाव फटतेही ढल रहा भै’ अशी खास हैदराबादी शैलीची रचनाही सादर केली. सचिन यांनी अनेक रुबाई, शेर, मक्ते, गझल सादर करीत उर्दू काव्यावरील आपल्या अधिकाराचा अनुभव रसिकांना दिला.

या दोन मान्यवरांसह इतरही शायरांचा या मैफलीत सहभाग होता. इजाज शेख यांनी ‘हो अगर दिल में उजाले तो गझल होती है, घर के बुढो को संभाले तो गझल होती है’ तर दीपक मोहळे यांनी ‘लाख बुराई हो पर अच्‍छा ढुंढेंगे, हम इस मुश्‍कील में भी रास्‍ता ढुंढेंगे’ अशी लक्षवेधक शायरी ऐकवली. क्रांती साडेकर ‘रूह’ यांनी ‘तुफां ये नहीं थमनेवाला, इसे चाहे लाख सफ‍िने दे’, सुधीर बल्‍लेवार ‘मलंग’ यांनी ‘जब कभी दिल के दाग देते है, आपका ही सुराग देते है’ ही गझल सादर करून रसिकांची दाद मिळविली. मुशायराचे निवेदन करणाऱ्या अनंत नांदूरकर ‘खलिश’ यांनी ‘घर में द‍िमक लगी है इज्‍जत को, शहर में नाम कर रहा हूं मै’ असा शेर सादर करीत इतर शायरांना समर्पक साथ दिली.
मुख्यमंत्री पालिकेवर नाराज; स्थानिक तक्रारी गेल्यामुळे आयुक्तांना ‘सीएमओ’कडून नोटीस
मनोगतातून अमित वाईकर यांनी वडिलांच्या आठवणींना उजळा दिला. अपर्णा वाईकर यांनी अतिथींचे स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. उदय गुप्ते यांनी केले. कार्यक्रमाला नागपूरसह विविध देशांतील अतिथी, वाईकर परिवारातील सदस्य तसेच उर्दूप्रेमी उपस्थित होते.

सचिन यांच्याचौपाईचे अयोध्येत सूर

‘गीत गाता चल’ च‍ित्रपटातील ‘मंगल भवन अमंगल हारी’ ही प्रसिद्ध चौपाई अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात तेथील सर्व स्क्रीन्सवर दाखविली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या चौपाईला सचिन पिळगावकर यांचा आवाज लाभणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही चौपाई ध्वनिमुद्रित केली जाणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमादरम्यान वैभव जोशी यांनी दिली. त्यामुळे, देशाचे लक्ष असलेल्या या सोहळ्यादरम्यान सचिन यांचा सूर अयोध्येत घुमणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed