आठवले शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी सन २०२४ मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील असा दावा केला. आरपीआयला लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १० जागा हव्या आहेत. शिर्डी आणि विदर्भातील एक लोकसभा मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा, अशी मागणी मी केली आहे. गावागावत आमची मते आहेत. त्यामुळे आम्हाला विसरून चालणार नाही, असे सांगत यासाठी मी शिंदे, फडणवीसांसह अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे आठवलेंनी यावेळी सांगितले. येत्या निवडणुकीत राज्यातील ४० ते ४२ जागा महायुती जिंकणार आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिराचे उद्घाटन केले जात नाही. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटन होत असल्याचा दावा आठवले यांनी केला. सगळ्या नेत्यांना उद्घाटनाचे निमंत्रण आहे. त्यामुळे यात राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण दिले तर संजय राऊत यांनी त्यांना आडवू नये, असा सल्लाही त्यांनी राऊत यांना दिला.
भाजप मनसेला घेणार नाही
भाजप मनसेच्या संभाव्य युतीवरही आठवले यांनी भाष्य केले. भाजप मनसेला सोबत घेणार नाही. कारण भाजपला ते परवडणारे नाही. राज ठाकरे मोठे नेते असले तरी, त्यांच्या सभेला गर्दी होते. मते मात्र मिळत नाहीत, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला. भाजपने राज ठाकरेंना सोबत घेतले तर, त्याचा उत्तर भारतात तसेच मुस्लिमबहुल राज्यात भाजपला फटका बसेल, असा दावाही त्यांनी केला.
जरांगेचे मुंबईत स्वागत करू
मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी रास्त आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही भेट घेणार आहे. ओबीसींवर अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे. आठ लाखाच्या आत ज्यांचे उत्पन्न असेल त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा, असे सांगत, मराठा समाजाला १३ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी आठवले यांनी केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आम्ही स्वागत करू, परंतु, राज्यसरकारने २० जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली. छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.