हिंदू जनजागृती समिती, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, संकल्प हिंदू राष्ट्र अभियान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय युवा गठबंधन, सर्वभाषिक बाह्मण महासंघ, चित्पावन ब्राह्मण महासंघ आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बैठकीला ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.
बैठकीमध्ये लव्ह जिहाद तसेच मंदिरांना मदतीच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,‘लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य सरकारने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल.’
गुजरात, उत्तर प्रदेशात कायदा
महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या विरोधात पन्नासहून अधिक मोर्चे काढण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, आता एक वर्ष उलटून गेले तरीही कायदा झालेला नाही. तर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केला आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी बैठकीत दिली.