• Sat. Sep 21st, 2024
अभिमानास्पद! पुणेकरांनी मोडला चीनचा वर्ल्ड रेकॉर्ड; गोष्टी सांगण्यात भारताने रचला नवा विश्वविक्रम

म. टा. प्रतिनिधी, पुणे

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी आयोजित केलेल्या ‘ पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या ‘ या उपक्रमात तीन हजार ६६ पालकांनी सहभागी होत, आपल्या पाल्यांना सलग चार मिनिटे गोष्ट सांगितली. ही गोष्ट पूर्ण होताच पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्ट सांगण्याचा चीनचा रेकॉर्ड मोडत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर गीतांवर आनंदोत्सव साजरा झाला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा उस्फुर्त घोषणा दिल्या.

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने पुणे महापालिकेने पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उद्योजक जय काकडे, ॲड. एस. के. जैन, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, न्यासाचे संचालक युवराज मलिक, अभिनेत्री प्राजक्ता माळी, संयोजक राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रसेनजित फडणवीस, राहुल पाखरे, बागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते.

मुलांना वाचनाची गोडी लागण्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम आहे. माझा मुलगा लहानपणीपासून वाचतो. या उपक्रमाच्या निमित्ताने गोष्ट सांगत रेकॉर्डमध्ये सहभागी होता आले.

– शलाका शिराळकर, पालक

वाचन संस्कृतीचा चालना देण्यासाठी मोठ्या संख्येने पालक हे गुरुवारी सकाळपासून स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले. साधारण दहाच्या सुमारास तीन हजार २०० पेक्षा अधिक पालक आणि त्यांच्या पाल्यानी सहभाग नोंदवला. या सहभागी झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना क्षिप्रा शहाणे यांनी लिहिलेल्या निसर्गाचा नाश करू नका या पुस्तकातील धड्याचे सलग तीन मिनिटे वाचन केले. यावेळी गिनेस बुक रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी ‘पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या’ हा नवा विश्वविक्रम भारताच्या नावाने प्रस्थापित केल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मैदानावर एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विश्व विक्रमानंतर पालक आणि मुलांनी वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. या संपूर्ण उपक्रमाला उद्योजक सूर्यकांत काकडे यांचे सहकार्य लाभले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करीत, त्यांना वाचन करण्याची प्रेरणा दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन पुणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चोख पद्धतीने केले.. सूत्रसंचालन प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

पालकांकडून गोष्ट ऐकण्याचा उपक्रम चांगला आहे. वाचनाची आवड असल्याने, पुस्तके वाचली आहे. या उपक्रमात आठवीच्या मुलांच्या दृष्टीने पुस्तके दिली असती, तर आणखी आनंद झाला असता.

– ओजस शिराळकर, इयत्ता आठवी

अशाप्रकारे चीनचा रेकॉर्ड मोडला

पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने पालकांनी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगायच्या उपक्रम गुरुवारी पार पडला. या उपक्रमाचा यापूर्वीचा विश्वविक्रम चीनच्या नावावर होता. चीनमध्ये साधारण आठ वर्षांपूर्वी दोन हजार ४७९ पालकांनी एकाचवेळी आपल्या पाल्यांना गोष्टी सांगितल्या. त्यानंतर गुरुवारी स. प. मैदानावर तीन हजार ६६ पालकांनी एकत्रित येत, आपल्या आपल्या पाल्यांना ‘निसर्गाचा नाश करू नका ‘ हा धडा वाचला आणि विश्वविक्रमाला गवसणी घातली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed