या भुयारी मार्गाचा कायापालट करण्याचा निर्णय मुंबई पालिकेने दहा महिन्यांपूर्वी घेऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. भुयारी मार्गाच्या डागडुजीची आवश्यक्ता असून, त्याची संरचनात्मक चाचणीही (स्ट्रक्चरल ऑडिट) झाली आहे. डागडुजीसह सीसीटीव्ही, अग्निरोधक यंत्रणा, वायुविजन यंत्रणा बसवण्याचा पालिकेला विसर पडला आहे.
सीएसएमटीतील भुयारी मार्गाचे उद्घाटन ८ सप्टेंबर १९९९ रोजी तत्कालीन महापालिका आयुक्त के. नलिनाक्षन यांच्या हस्ते झाले होते. या भुयारी मार्गाला चार प्रवेशद्वार असून, एक सीएसएमटीकडे येणारा, दुसरा मार्ग मुख्य महानगरदंडाधिकारी न्यायालयाच्या दिशेने, तिसरा मार्ग महापालिकेकडे जाणारा आणि चौथा मार्ग हा टाइम्स ऑफ इंडियाच्या दिशेने बाहेर पडणारा आहे. भुयारी मार्गातून दररोज मोठ्या संख्येने पादचारी ये-जा करतात. मात्र, खूपच जुना असलेला भुयारी मार्ग आणि झालेल्या दुरवस्थेमुळे या भुयारी मार्गाचा कायापालट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सुरक्षेच्या दृष्टीने भुयारी मार्गात कोणत्याही सुविधा नाहीत. आग तसेच इतर अनुचित घटना घडू नयेत आणि प्रवासी, पर्यटकांची सुरक्षाही राहावी, यासाठी भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरा, अग्निशमन यंत्रणा, उत्तम दर्जाची विद्युत रोषणाईही करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. गेल्या पावसाळ्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र, ही अंमलबजावणी अद्याप कागदावरच आहे. साधारण ३० सीसीटीव्ही कॅमेरा, तर दहा अग्निरोधक यंत्रणाही बसवल्या जाणार होत्या. या कामासाठी निविदाही काढण्यात आली होती. परंतु, यातील एकाचीही अंमलबजावणी झालेली नाही. या भुयारी मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले असून, भुयारी मार्गाच्या डागडुजीची आवश्यक्ता असल्याचे नमूद आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, मुंबई पालिकेच्या पूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भुयारी मार्गाची डागडुजीही सुरू झालेली नाही.
प्रचंड उकाडा
सध्या सीएसएमटी भुयारी मार्गातून जाताना पादचारी, पर्यटकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यातच फेरीवाल्यांचा अडथळा पार करून जाताना, अनेकांची दमछाक होते. भुयारी मार्गात हवा खेळती राहावी यासाठी २०१६च्या आधी वायुविजन यंत्रणा कार्यरत होती. मात्र, २०१६मध्ये मुंबई पालिकेने भुयारी मार्गाच्यावर बाहेरील बाजूने सेल्फी पॉइंटची उभारणी केली. वायुविजनसाठी असलेले मोठे पंखे बाहेरील दिशेने असल्याने आणि ते सेल्फी पॉइंटसाठी अडथळे ठरत असल्याने ही यंत्रणा काढण्यात आली होती.
फेरीवाल्यांवर कारवाई कधी?
शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सीएसएमटी भुयारी मार्गातील फेरीवाल्यांना हटवून हा मार्ग मोकळा केला होता. त्यावेळी पादचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्यावेळी भुयारी मार्गात स्वच्छताही चांगली ठेवण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवसापासून पुन्हा सीएसएमटी भुयारी मार्गात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले. ही संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरगिरीही वाढतच आहे. या अनधिकृत फेरीवाल्यांवर मुंबई पालिकेकडून तात्पुरत्या कारवाईचा मुलामा दिला जातो. त्यानंतर पुन्हा जैसे थे च परिस्थिती होते. अगदी हाकेच्या अंतरावर मुंबई महापालिका असून याच मुख्यालयातील पालिकेचे अधिकारी, कर्मचारीही भुयारी मार्गाचा वापर करत असतात. मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मेट्रो भुयारी मार्गाचा कायापालट करताना सुरक्षिततेसाठी उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे मध्यंतरी पालिकेतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. मात्र सीएसएमटी भुयारी मार्गाच्या कायापालट किंवा सुविधांबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही.
भुयारी मार्गाचा वापर मोठ्या संख्येने पादचारी करतात. मात्र, याची अवस्था अत्यंत वाईट असून, महापालिकेसह मुंबई शहर पालकमंत्रीही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, हे कारण न कळण्यासारखे आहे. वायुविजन यंत्रणेसह सीसीटीव्ही, अग्निरोधक यंत्रणा बसवणार कधी, असा प्रश्न असून, महापालिकेने त्यावर तातडीने निर्णय घ्यावा.
– रवी राजा, माजी महापालिका विरोधी पक्षनेता, काँग्रेस