पुणे : पुण्याच्या औद्योगिक क्षेत्रातून आणखी एक कारखाना आता महाराष्ट्रातून बाहेर पडण्याचा तयारीत आहे. गुजरातच्या राजकोट याठिकाणी पुण्याजवळील करंदी गावातून हा कारखाना जाण्याच्या तयारीत आहे. शिरुर तालुक्यातील करंदी या गावात २००८ पासून सुरू असलेला संकल्प इंजिनिअरिंग हा कारखाना स्थलांतरित होणार आहे. याचं कारण मात्र प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून जाण्याचा निर्णय घेत असल्याचे कारखान्याकडून सांगण्यात येत आहे.
दीड ते दोन हजारांहून अधिक कामगारांवर अवलंबून असलेला हा कारखाना २००८ साली खाजगी जागेवर सुरू झाला. शेजारीच महसूल विभागाची जागा असल्याने महसूल विभागाच्या परवानगीने १०० मीटर अंतराचा रस्ता कारखान्याने वापरात घेतला. पुढे ही महसूल विभागाची जागा वन विभागाकडे हस्तांतरित झाली. आता मात्र वन विभागावर दबाव आणून काही महाशयांनी हा कारखाना बंद करण्यासाठी प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळून कारखान्याच्या मालकाने महाराष्ट्रात प्रकल्प नकोच असं म्हणत गुजरातला पसंती देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकीकडे सरकार महाराष्ट्रात नवीन प्रकल्प आणण्यासाठी उद्योजकांना सवलती देण्याचा विचार करत आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील आहेत तेच प्रकल्प बाहेर कसे जातील, याची वाट पाहत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.