• Fri. Nov 15th, 2024

    आदिवासी भागातील सेवेचे अधिकाऱ्यांनी संधीत रूपांतर करावे केंद्रीय मंत्री नारायण राणे

    ByMH LIVE NEWS

    Nov 24, 2023
    आदिवासी भागातील सेवेचे अधिकाऱ्यांनी संधीत रूपांतर करावे केंद्रीय मंत्री नारायण राणे

    नंदुरबार, दिनांक 24 नोव्हेंबर 2023 (जिमाका वृत्त) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंचित आणि दुर्गम भागातील प्रत्येक गरीबाला समृद्ध करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्पयात्रा’ देशभरातील आदिवासी भागातून सुरू असून या भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन केद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

    ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की व केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या विविध यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

    यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. राणे म्हणाले, खरी समानता तेव्हाच दिसते जेव्हा जेव्हा देशातील कोणत्याही नागरिकाबरोबर भेदभाव होण्याच्या साऱ्या शक्यता समाप्त होतात. समानता आणि सामाजिक न्यायाचा विश्वास तेव्हाच वाटतो जेव्हा सर्वांना बरोबरीने, समान भावनेतून सरकारी योजनांचा लाभ मिळेल. देशात दुर्दैवाने आजही असे अनेक गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे सरकारी योजनांची योग्य अशी माहिती नाही. ज्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी जी धावपळ करावी लागते ती करण्यास ते सक्षम नाहीत. शेवटी आपण कुठवर या लोकांना आहे त्या हालाखित जगायला लावणार आहोत? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेडसावणाऱ्या याच प्रश्नाच्या वेदनेतून, त्रासातून, संवेदनेमधून ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चा विचार उदयास आला आहे. या यात्रेदरम्यान प्रशासन मिशन मोडमध्ये राज्यातील, जिल्ह्यातील गावागावात जाईल, ज्याचा खऱ्या अर्थाने या सरकारी योजनांवर खरा हक्क आहे, त्या प्रत्येक गरीब, वंचिताला, त्याच्या हक्काच्या या सरकारी योजनांचा लाभ देईल. विकसित भारत संकल्प यात्रेत प्रत्येक गावात जाऊन खऱ्या  लाभार्थ्यांना भेटून  यशस्वी करण्याच्या संकल्पामुळे मोफत अन्नधान्य मिळवून देणारी शिधापत्रिका प्रत्येक गरीबाजवळ असेल,प्रत्येक गरिबाकडे उज्वला गॅस जोडणी असेल, सौभाग्य योजनेद्वारे वीज पुरवठा सुरू राहील आणि नळातून पिण्याचे पाणी मिळेल. प्रत्येक गरीबाजवळ पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय इलाज उपलब्ध करून देणारे आयुष्मान भारत कार्ड असेल. प्रत्येक गरिबा जवळ त्याचे स्वतःचे पक्के घर असेल. प्रत्येक शेतकरी सरकारच्या निवृत्तीवेतन योजनेबरोबर जोडला जाईल. प्रत्येक कामगार निवृत्ती वेतन योजनेचा लाभार्थी बनेल, प्रत्येक पात्र युवक मुद्रा योजनेचा लाभ घेऊ शकेल आणि एक नवउद्योजक बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल. विकसित भारत संकल्प यात्रा एका प्रकारे देशातील गरिबांना, माता भगिनींना, युवकांना, शेतकऱ्यांना हमखास विकासाचा खात्रीशीर पर्याय आहे.

    ते पुढे म्हणाले, विकसित भारताच्या प्रवासात देशातील प्रत्येक व्यक्तीचे सामर्थ्य वापरून घेण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. दोन महिन्यांपूर्वी पी एम विश्वकर्मा योजना देखील सुरू केली आहे. जे आपल्या पारंपरिक कौशल्य साठी ओळखले जातात. विविध व्यवसाय करणारे बलुतेदार विश्वकर्मा मित्र असोत, किंवा शेतकरी बांधव यावसर्वांना प्रशिक्षण दिले जाईल आणि या दरम्यान  त्यांना पैसाही मिळेल. सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून त्यांना उत्तम साधने आणि तंत्रज्ञान देखील केंद्र सरकारमार्फत पुरवले जाईल.

    ते पुढे म्हणाले, देशातल्या शेतकऱ्यांना नुकताच पीएम किसान सन्मान निधीचा १५ वा हप्ता देण्यात आला त्यात कोणाचीही मध्यस्थता नाही. सरकारचे शेतकऱ्यांशी थेट नाते जुळले आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून अधिकाऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी बिसाणे, पीकपद्धती याबात मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. सरकारने  शेतकऱ्यांसोबत पशुपालक आणि मासेपालकांना किसान क्रेडिट कार्डाच्या सुविधेशी जोडले आहे.पशुधनाच्या मोफत लसीकरणावर सरकारने भर दिला आहे. पशूंचे मोफत लसीकरण केले जात आहे. आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ द्या. मत्स्य पालनाला चालना देण्यासाठी, मत्स्य संपदा योजने अंतर्गत, आर्थिक मदत दिली जात आहे. आज देशात संघटित  एफ पी ओ, तयार होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला आहे. आणि बाजारपेठेत जाण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. भरड धान्याला नवी ओळख देत या अशी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जात आहे. याचाही लाभ आमच्या आदिवासी बंधू भगिनींना होताना दिसत आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळोदा तालुक्यातील करडे,सिंगसपूर या ग्रामपंचायतींच्या वतीने आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमांसाठी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed