यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यातील सार्वजनिक विकासाची कामे प्रामाणिकपणे केली आहेत, यापुढेही अशाच कामांना प्राधान्य राहील असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज दिग्रस तालुक्यातील विविध विकासकामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमात केले.
यावेळी पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते वाई, मेंढी आणि लोणी येथील रस्ते, पाणी पुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युत रोहित्र, पांदण रस्ते अशा विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.राठोड पुढे म्हणाले, लोकांची कामे करताना कोणताही भेदभाव करत नाही. संविधानानुसार लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असलेले काम करीत आहे. शासनामार्फत शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, बेरोजगार युवक, सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, त्या तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी सातत्याने काम करत आहे.
निराधारांच्या मानधनात वाढ, विविध समाज घटकातील गरजूंसाठी घरकुल योजना, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग प्रकल्प, महिलांना उद्योगासाठी सुविधा, स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाटप, मॉडेल शाळांची निर्मिती, गोरगरिबांना आनंदाचा शिधासह साड्या, शेतकऱ्यांसाठी विविध योजना यासह वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबविल्या जात आहेत. गावात या योजनांच्या लाभासाठी गरजूंनी प्रस्ताव किंवा अर्ज करावे, त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. अनेकवेळा आवश्यकता असल्यास शासनस्तरावरील निर्णयात बदलही केले आहेत. यापुढेही लोकहिताची विकासकामे प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले.
यावेळी मेंढी येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम, गावांतर्गत नळ जोडणी, सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणे, लोणी येथील रस्त्याची सुधारणा, पाणी पुरवठा योजना, सिमेंट व पांदण रस्ते, अंगणवाडी बांधकाम, सामाजिक सभागृह बांधणे आणि वाई येथील रस्त्याची सुधारणा, सिमेंट रस्ता, सामाजिक सभागृह सौंदर्यीकरण करणे, श्री बलखंडी महाराज संस्थानाला संरक्षण भिंत व शौचालय बांधकाम आदी विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून त्याबाबत चर्चा केली. ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अडीच कोटींच्या वाई ते कलगांव फाटा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
दिग्रस तालुक्यातील वाई ते कलगांव फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करण्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आज करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत या कामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याच्या कामामुळे ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.