• Mon. Nov 25th, 2024
    Pune Crime: ललित पाटील प्रकरणाला धक्कादायक वळण, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य योग्यपद्धतीने बजावले नाही; तसेच पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

    नाथाराम काळे आणि अमित जाधव अशी अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रोनची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी ललितच्या साथीदाराला आणि ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असताना ललित पाटीलने दोन ऑक्टोबर रोजी बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पलायन केले.

    क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्यूज: वर्ल्ड कप फायनलसाठी ६ विशेष एक्स्प्रेस सुसाट जाणार, वेळापत्रक जाहीर
    या घटनेनंतर ससून रुग्णालयात बंदोबस्ताला असलेले सहायक निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि सात पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलिस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली.

    ललितने पोलिसांवरही केला होता आरोप

    पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करी रॅकेट उद्धवस्त केले. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला ललित पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, पाटीलला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला मुंबई पोलिसांनी बेंगळुरू-चेन्नई पट्ट्यातून अटक केली. ‘माझ्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. त्यामुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली होती,’ असा गंभीर आरोप ललितने पोलिसांवर केला होता.

    मुंबईकरांनो उद्या बाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा, मध्य-हार्बरवर देखभाल-दुरुस्ती; पाहा वेळापत्रक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *