दिवाळीच्या कालावधीमध्ये नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई केली आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्याभरातून माल जप्त केला आहे. ३१ ऑगस्ट ते ७ नोव्हेंबर या कालावधीत तेल व वनस्पती तेलाचे एकूण ५ नमुने आणि वनस्पतीचे २ नमुने, दूध या अन्न पदार्थाचे ५५ नमुने तसेच दुग्धजन्य पदार्थाचे १८ नमुने, रवा, मैदा, आटा व इतर असे एकूण २२ नमुने तसेच तुप, खवा, पनीर या अन्न पदार्थाचे एकूण ११ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त सु. द. जिंतूरकर यांनी सांगितले आहे.
अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाई मोहिमेत १८ सप्टेंबर रोजी बेगमपुर (ता. मोहोळ) येथील बॉम्बे स्विट मार्ट व बेकरी या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी ४० किलो, सुमारे १० हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. १० ऑक्टोबर रोजी उत्तम चौधरी, भवानी पेठ, सोलापूर या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी – ६८ किलो, किंमत रु. १७ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. १६ ऑक्टोबर रोजी टेंभुर्णी (ता.माढा) येथील भगवान राम पालिवाल या पेढीवर धाड टाकून स्पेशल बर्फी – १०३ किलो, किंमत २५ हजार ७५० रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरायला बंदी आहे. गोड अन्नपदार्थांमध्ये काही अंशी याला परवानगी दिली जाते. पण हॉटेलमधील भाज्या आणि आठवडी बाजारात विकणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये रंग वापरण्यास बंदी आहे. असे असतानाही अनेक जण खाद्यपदार्थ आकर्षित दिसण्यासाठी रंग वापरताना आढळून येतात. या रंगाचा शरीरावर अपायकारक परिणाम दिसून येतो. सोलापुरातील तीन हॉटेलमध्ये काजू करी मध्ये लाल रंग वापरण्यात आल्याचे दिसून आले आहे. या हॉटेलवाल्यांना दंड करण्यात आला आहे. खाद्यतेलातही भेसळ आढळली आहे.