• Tue. Nov 26th, 2024

    राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा उपक्रम – केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

    ByMH LIVE NEWS

    Oct 25, 2023
    राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा उपक्रम – केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

    छत्रपती संभाजीनगर,दि.२५(जिमाका):- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’, ‘मिट्टी को नमन; विरोंको वंदन’ हा उपक्रम राबविला जात आहे. गावागावातून पवित्र मातीचे संकलन करुन गावांगावांतील शहिदांना वंदन करणारा हा उपक्रम देशवासियांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धींगत करणारा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ व नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

    ‘मेरी माटी मेरा देश’, ‘मिट्टी को नमन और विरोंको वंदन’ अंतर्गत आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पवित्र माती आज ११ कलशांमध्ये भरुन मुंबईकडे रवाना झाली. त्यानंतर दि.३१ ला दिल्ली येथे हे पथक जाणार आहे. पवित्र कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांच्या पथकास आज डॉ. कराड यांच्या उपस्थितीत मुंबईकडे रवाना करण्यात आले.

    यानिमित्त जिल्हा नियोजन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश रामावत, नेहरु युवा केंद्राचे शुक्ला तसेच सर्व स्वयंसेवक व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

    जिल्ह्यातील विविध गावांमधून पवित्र मातीचे संकलन ग्रामपंचायत स्तरावर करुन ही माती तालुकानिहाय तसेच महानगर पालिका, नगरपंचायत अशा ११ कलशांमध्ये एकत्र करण्यात आली. हे कलश घेऊन आज जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे पथक मुंबईकडे रवाना झाले. त्यांना डॉ. कराड यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील २३ स्वयंसेवक या पथकात आहेत.  उद्या म्हणजे दि.२६ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी मान्यवर या कलशांचे स्वागत करतील. त्यानंतर हे पथक दिल्लीकडे रवाना होईल. तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातून प्राप्त या पवित्र कलशांचे स्वागत करतील. देशभरातून गोळा झालेले हे कलश व त्यातील पवित्र माती ही कर्तव्य पथावर अमृत वाटीकेच्या निर्माणात वापरली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. डॉ. कराड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्प आहे. त्यात प्रत्येक देशवासियाचे योगदान असावे ही यामागील कल्पना आहे. त्यासाठी शासनाने प्रत्येक क्षेत्रात सुसुत्रिकरण केले आहे.  सर्व क्षेत्रात भारत विकसित व्हावा यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी रामावत यांनी केले.सहभागी प्रत्येक स्वयंसेवकास पुष्प देऊन निरोप देण्यात आला. राष्ट्र्गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed