• Fri. Nov 15th, 2024

    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार

    ByMH LIVE NEWS

    Oct 20, 2023
    अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार

                मुंबई, दि. २० : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत ७० हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत. राज्यात सध्या ७० हजार लाभार्थ्यांना ५ हजार १४० कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसायाकरिता वितरीत केले आहे. यापैकी ५८ हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने ५६७ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा व्याज परतावा केला आहे. प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्भूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरु करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरवात करण्यात येत असल्याची माहिती  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष  नरेंद्र  पाटील यांनी दिली.

                महामंडळामार्फत गेल्या वर्षभरात राबवण्यात येत असलेल्या योजनांसंदर्भात माहिती देताना  मंत्रालयाच्या विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित  पत्रकार परिषदेत श्री. पाटील  बोलत होते.

                श्री.पाटील म्हणाले की, महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगित असलेली ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरु करण्याची कार्यवाही केली आहे.  येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलतीला  सुरुवात होणार आहे. यासाठी महिंद्रा आणि एस्कॉट  टर्बो या दोन कंपन्यासोबत सामंजस्य करार (एमओयू) करण्यात  येणार आहे. मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून  १० हजार ते २ लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

                महामंडळाच्या योजनांची जनजागृती राज्यामध्ये गावपातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हानिहाय दौरे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून  राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार-प्रसिध्दी करण्यात येत आहे.  ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरु करुन त्याचा लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत पत्रव्यवहार करुन, ही बाब उपसमितीमध्ये देखील मांडली. ही बाब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडून, महामंडळाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत मिळावी याकरिता त्यांनी प्रयत्न करुन ट्रॅक्टर प्रकरणे सुरु करण्याकरिता कार्यवाही केली असल्याचे सांगितले.

                लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या योजनांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-1) अंतर्गत कर्ज मर्यादा रु. १० लाखांवरुन रु. १५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर  ३ लाख रुपयांच्या मर्यादेत करण्यात येणाऱ्या व्याज परताव्याची मर्यादा ४.५ लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी ५ वर्षांहून ७ वर्षापर्यंत वाढविला आहे. महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वाकरिता वयोमर्यादेची अट ६० वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे.

                ‘शासन आपल्या दारी’ प्रमाणेच लाभार्थी संवाद मेळावे आयोजित करून ‘महामंडळ आपल्या दारी’ ची कार्यवाही सुरु केली असून आतापर्यंत राज्यात ३ संवाद मेळावे व एकूण ११ जिल्ह्यांमध्ये दौरे करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक ऑफ इंडिया समवेत सामंजस्य करार केला आहे. त्याचप्रमाणे पुढील कालावधीत महामंडळ राज्यातील सर्व सीएससी सेंटर बरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेअंतर्गत ऑनलाईन स्वरुपात सहकार्य सीएससी (CSC) सेंटरच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया महामंडळाच्यास्तरावर सुरु आहे. भविष्यात महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक संख्येने  मराठा तरुण उद्योजक तयार करण्याचे ध्येय असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.

    ००००

    वंदना थोरात/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed