शंकर तिरुजी कुंभारे (५२), विजय शंकर कुंभारे, त्यांची विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९, रा. गडअहेरी ता. अहेरी), मावशी आनंदा उराडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि. चंद्रपूर), मुलगा रोशन शंकर कुंभारे (२८) अशी मयतांची नावे आहेत. सून संघमित्रा रोशन कुंभारे (२५) व रोशनची मामी रोजा रामटेके (५२) या दोघींना पोलिसांनी अटक केली आहे.
२२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यावर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व उलट्या होऊ लागल्याने पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले. त्यानंतर शंकर यांचीही प्रकृती खालावली. दोघांनाही उपचारादरम्यान नागपूरला हलविले. उपचार सुरु असताना २६ रोजी शंकर तर २७ रोजी विजया यांची प्राणज्योत मालवली. ही घटना घडली तेव्हा विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर (२९,रा.गडअहेरी ता.अहेरी) माहेरी होती. प्रकृती खालावल्याने चंद्रपूरला नेताना ८ ऑक्टोबरला वाटेत तिने प्राण सोडले. शंकर कुंभारे यांचा मोठा मुलगा रोशन कुंभारे (२८) याचा १५ ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उंदीरवाडे (५०, रा. बेझगाव ता. मूल जि.चंद्रपूर) ही अंत्यविधीसाठी महागावला आली होती. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान १४ ऑक्टोबरला मध्यरात्री तिची प्राणज्योत मालवली. तर रोशनच्या आई-वडिलांना दवाखान्यात नेणारा खासगी वाहनचालक राकेश अनिल मडावी ( रा.महागाव ) याच्यावर नागपूर, रोशनचा मावसभाऊ बंटी उंदीरवाडे (रा.बेझगाव ता.मूल जि.चंद्रपूर) याच्यावर चंद्रपूर व रोशनचा भाऊ राहुल हा दिल्लीत उपचार घेत आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
लागोपाठ होणाऱ्या मृत्यूसत्रानंतर अहेरी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड आणि पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी तपास सुरु केला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी १८ ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. अपर अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, अनुज तारे, उपअधीक्षक डॉ. सुदर्शन राठोड उपस्थित होते.
प्रेम विवाहानंतर अख्खं कुटुंब झालं उध्वस्त
संघमित्रा ही मूळची अकोला जिल्ह्यातील असून ती अहेरी येथे पोस्टात कर्मचारी होती. रोशन कुंभारे हा पण त्याच ठिकाणी कर्मचारी होता. त्यांचं सुत जुळलं आणि काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्न केले. संघमित्राने घरच्यांचा विरोध असतानाही रोशन सोबत लग्न केले आणि त्यातून तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. त्यादरम्यान रोशनला पदोन्नती मिळाली आणि तो सिरोंचा तालुक्यात रुजू झाला. मात्र, संघमित्रा आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याने तिला नोकरीवर परत घेतले नव्हते अशी माहिती आहे.
वडील गेले, नौकरी गेली त्याच्या बदल्याची आग आणि दुसऱ्या एका नातेवाईकेचे संपत्तीच्या लालसेपोटी वाटणीतील वाटेदारच संपवून टाकण्याची मनीषा यातून दोघी एकत्र येऊन संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा घाट घातला. थंड डोक्याने, नियोजनबद्ध काम करत रंगहीन, पाण्यात विरघळणारे विष ज्याचा हळूहळू परिणाम होतो, ते वेगवेगळ्या वेळी जेवणातून आणि पाण्यातून देत पाच जणांची निघृण हत्या केली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर घटनेची राज्यभर चर्चा सुरू असतानाच गडचिरोली पोलिसांनी या रहस्यमय मृत्यूचे गूढ उकडले हे विशेष.