आंतरवली सराटी येथे घेतलेल्या विराट सभेत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं आहे. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात गरळ ओकू नये. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे फडणवीसांनी गुणरत्न सदावर्ते यांना समज द्यावी, असं आवाहन करताना मराठ्यांना अंगावर घेऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यांच्या इशाऱ्याला उत्तर देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर तोंडसुख घेतलं.
जरांगे कन्फ्यूज, कुठून आरक्षण हवंय त्यांनाच कळेना : सदावर्ते
“आज आपण जर बघितलं असेल तर जरांगे काही काळ मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण द्या, असं म्हणाले. थोड्या वेळानंतर म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्या. म्हणजे त्यांनाच माहिती नाही आरक्षण कुठल्या प्रवर्गातून हवंय. जरांगे रानभुल लागल्यासारखं बोलत होते. जरांगे स्वतःच कन्फ्यूज आहे की मराठा म्हणून घ्यायचं आहे की कुणबी म्हणून घ्यायचं आहे. पण दोन्ही जरी मागणी केल्या तरी मला हेच म्हणायचं आहे की दोन्ही मागणीला महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणास पात्र ठरत नाही. तीन आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलंय”, असा पुनरुच्चार सदावर्ते यांनी केला.
जरांगेंनी जमवलेली गर्दी म्हणजे जत्रा
“आजची जी जत्रा भरली होती. त्या जत्रेमध्ये संविधानिक चर्चा झाली नाही. तुम्ही त्याला खूप मोठी सभा झाली, खूप मोठी सभा झाली, असं म्हणू नका. आपल्या आम्ही हिंदू राष्ट्रामध्ये एक संस्कृती आहे. आमच्याकडे महादेवाची जी जत्रा असते, त्या यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात लोकं असतात. त्यामुळे अशी काहीही विशेषणं लावू नका”, असं म्हणत सदावर्तेंनी आजच्या जरागेंच्या सभेची खिल्ली उडवली.
जरांगेंच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज नाही
“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने जे बेसिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे, त्या आरक्षणाच्या जागांचं रक्षण करण्यासाठी एक साधा शिपाई म्हणून मी काम करतोय, ते करणं माझं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मला हे सांगायचं आहे की कोण काय बोलतोय, त्याकडे मी लक्ष देत नाही. जरांगेंच्या बोलण्याला किंमत द्यायची गरज नाही. कारण जरंगे हे त्यांच्या पॉलिटिकल बॉसच्या आधारावर बोलतात”, असा निशाणा सदावर्ते यांनी साधला.
सरकारने आम्हाला हलक्यात घेऊ नये : जरांगे पाटील
लाखोंच्या समुदायाला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी चौफेर टोलेबाजी केली. आज १२ वाजता सुरू होणारी सभा त्यांनी थोडी अगोदरच सुरू केली. उन्हाचा वाढता पारा लोकांसाठी त्रास दायक ठरू नये म्हणून मनोज यांनी लवकरच संबोधनाला सुरूवात केली. नजरेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मराठा समाज बांधव दिसत होते.
सुरुवातीला मनोज यांनी उपस्थित समाज बांधवांसह उपस्थित पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे, पत्रकारांचे आभार मानले. आजची सभा ही मराठ्यांसाठी महत्त्वाची असून सरकारने २२ तारखेपर्यंत सकारात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. त्यासाठी २२ तारखेला पत्रकार परिषद घेऊन आपण पुढची दिशा ठरवू, असं सांगत त्यांनी आलेल्या समाज बांधव, भगिनींनी शांततेने घरी जाण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा शांतताप्रिय असला, शेतीत घाम गळणारा असला तरी सरकारने आम्हाला हलक्यात घेऊ नये. २४ तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, मी पुन्हा तीव्र उपोषणाला बसेन, मग एक तर आरक्षणाचा जल्लोष होईल, नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल, असा सज्जड इशारा जरांगे यांनी दिला.