मिळालेल्या माहितीनुसार, जवान योगेश शिंदे हे पोळ्याच्या सणानिमित सुट्टीवर आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासोबत पोळ्याचा सण साजरा केला दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. १५) रोजी ते काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने वरून वनसगाव रस्त्यावरून जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडी आणि त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक झाली. यात जवान योगेश शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर रात्री त्यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी देवळाली कॅम्प येथील आर्मी सेंटर येथे पाठविण्यात आला होता.
आज शनिवार (दि.१६) रोजी जवान योगेश शिंदे यांच्यावर खडक माळेगाव येथे आणल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान योगेश शिंदे यांनी भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा केली योगेश शिंदे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजई असा परिवार आहे. त्यांच्या या अपघाती निधनाने शिंदे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गत आठवड्यातच नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या हरणुल येथील जवान विकी चव्हाण यांना जम्मूतील पुंछ राजोरी येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे सुपुत्र योगेश शिंदे यांचे निधन झाले आहे.