या दंगल प्रकरणी २० जणांवर खूनाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, १६ जणांवर दगडफेक, मालमत्तेचं नुकसान करणे, तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इतर संशयित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पुसेसावळीत आजही अत्यावशक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णपणे बंद होती.
रविवारी रात्री झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला आहे, तर दहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सोमवारी २३ जणांविरोधात औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील १९ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना वडूज न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिसांनी आणखी आरोपींचा शोध सुरू केला असून पोलीस सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे शोध घेत आहेत. त्यावरून काल मंगळवारी ९ जणांना अटक केली तर आज बुधवारी ६ जणांना औंध पोलिसांनी अटक केली आहे. या दंगलीत ४ ते ५ पोलीसही जखमी झाले आहेत.
कोणीही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करू नये. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. गेली ७२ तास इंटरनेट सेवा बंद ठेवली असल्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे. शासकीय कार्यालये, बँकिंग सेवा, शाळा महाविद्यालयांवर मोठा परिणाम झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे. आज रात्री १२ वाजता इंटरनेट सेवा सुरू होण्याचा शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल प्रयत्न करत आहे.
