• Mon. Nov 25th, 2024

    शिक्षकांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद : पालकमंत्री दादाजी भुसे

    ByMH LIVE NEWS

    Sep 9, 2023
    शिक्षकांमध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद : पालकमंत्री दादाजी भुसे

    नाशिक, दिनांक : 9 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा): प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षकांचे  स्थान महत्वपूर्ण असते. विद्यार्थ्यांना  भविष्यवेधी शिक्षण देण्याचे काम शिक्षक करीत असतात, अथक परिश्रम व ज्ञानार्जनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

    गंगापूर रोड येथील कै. रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील, नितीन बच्छाव (प्राथमिक) यांच्यासह सर्व शिक्षक पुरस्कारार्थी उपस्थित होते.

    पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, भविष्यातील आदर्श नागरिक घडविण्याची ताकद शिक्षकांमध्ये आहे. आज असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी, शाळांसाठी आपले आयुष्य समर्पित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम देखील शिक्षकच राबवित असतात. त्यासाठी काही शिक्षक स्वखर्चातून शाळांच्या विकासाला हातभार लावतात. तर काही गावातील नागरिकांना प्रेरीत करून त्यांच्या सहभागाने शाळांचा व विद्यार्थ्यांचा विकास साधत असतात. अशाच प्रतिकुल परिस्थिती व अथक परिश्रमातून ज्या शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या शिक्षकांची यापुढील जबाबदारी अधिकच वाढली आहे. तसेच पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कामातून प्रेरणा घेवून इतर शिक्षकांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

    सध्याच्या काळात तंत्रज्ञानाचे जाळे खूप विस्तारले असल्याने या डिजिटल युगात भविष्यातील नागरिक घडविण्यासाठी शिक्षकांनी देखील तंत्रस्नेही होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण समित्यांनी तेथील शिक्षकांनी आपल्या भागातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या 128 शाळा मॉडेल स्कूल (आदर्श शाळा) म्हणून विकसित करण्यात येत आहे. येत्या वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून विकसीत करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे. तसेच महानगरपालिकेच्या सर्व शाळांना स्मार्ट स्कूल बनविण्यात येणार आहेत. त्यासाठी 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री  श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षी राबविण्यात आलेला ‘सुपर 50’ हा उपक्रम यशस्वी झाला असून या उपक्रमामध्ये यावर्षी 50 ऐवजी 100 विद्यार्थ्यांना संधी दिली जात आहे. सुपर 50 मध्ये निवड झालेले विद्यार्थी हे भविष्यात नक्कीच आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवतील. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसोबतच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सक्षमपणे उभे करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. याचप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात राबविण्यात येणारा प्रत्येक नाविन्यपूर्ण शिक्षणाचा उपक्रम राज्यात शिक्षणाचा नाशिक पॅटर्न म्हणून राबविला जाईल, असा विश्वास ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

                                                                             

    आमदार सिमा हिरे म्हणाल्या, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करावीत. आपल्या ज्ञानदानाच्या कामातून उद्याचे आदर्श नागरिक घडणार असल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर देखील भर द्यावा, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

    जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण क्षेत्रात सुरु असून त्याअनुषंगाने शिक्षकांच्या कार्यशाळा देखील घेण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेतील अनेक शाळांमधील शिक्षक हे नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत असतात. असे सर्व शिक्षक हे आदर्श व गुणवंत आहेत, अशा सर्व शिक्षकांकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता नक्की वाढेल असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात अधिकाधिक शिक्षकांनी गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी नाव नोंदणी करावी, असे आवाहन ही त्यांनी केले.

    गुणवंत शिक्षक म्हणून यांचा झाला सन्मान:

    • प्रमिला भावराव पगार, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा भिलदर, ता.बागलाण,
    • वैशाली विलास जाधव, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा एकरुखे, ता.चांदवड,
    • अर्चना दादाजी आहेर, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा पिंपळेश्वर (वा), ता. देवळा,
    • नौशाद अब्बास मुसलमान, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा परमोरी, ता.दिंडोरी,
    • चित्रा धर्मा देवरे, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा अभोणा मुली, ता. कळवण,
    • अनिल सारंगधर शिरसाठ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, जामुंडे, ता.इगतपुरी,
    • प्रतिभा सुनील अहिरे, प्राथमिक शिक्षका, जिल्हा परिषद शाळा, वजीरखेडे, ता. मालेगाव,
    • देवेंद्र वसंतराव वाघ, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, देवीचा माथा, ता.निफाड,
    • उत्तम भिकन पवार, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा, हनुमान वाडी, ता.नाशिक,
    • राजकुमार माणिकराव बोरसे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, साकोरा, ता.नांदगाव,
    • रवींद्र सुभाष खंबाईत, पदवीधर प्राथ. शिक्षक, मोहपाडा ता.पेठ,
    • संतोष बाळासाहेब झावरे, जिल्हा परिषद शाळा, आशापुरी(घोटेवाडी) ता.सिन्नर,
    • परशराम पंडीत पाडवी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद शाळा शिंदे (दि) ता.सुरगाणा,
    • बालाजी बिभीषण नाईकवाडी, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडववाडी, ता. येवला,
    • अर्चना ज्ञानदेव गाडगे, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, हेदुलीपाडा ता. त्र्यंबकेश्वर

    000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed