मुंबई, दि. २९ : मुरबाड तालुक्यात भीमाशंकर अभयारण्यात सिद्धगड या ठिकाणी डोंगरावर वस्ती आहे. अतिवृष्टीमुळे येथील कुटुंबांना बाधित व्हावे लागले होते. त्यामुळे येथील कुटुंबांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सिद्धगडच्या बाधित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज दिले.
सिद्धगड व बारवी धरण पुनर्वसनाबाबत मंत्री दालनात आयोजित बैठकीत मंत्री श्री. पाटील बोलत होते. बैठकीला आमदार किसन कथोरे, कोकण विभागाच्या उपायुक्त रिता मेत्रेवार, ठाणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी रेवती गायकर, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत उईके, सुरेश बांगर, रमेश येंदे आदी उपस्थित होते.
सिद्धगडचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण करण्यात आलेले आहे किंवा याबाबत तपासून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देत मंत्री श्री. पाटील म्हणाले, की सिद्धगडचे भूवैज्ञानिक सर्वेक्षण झालेले असल्यास अहवाल प्रस्तावासोबत देण्यात यावा. पुनर्वसनासाठी जागा निश्चित केली असल्यास त्याचे सध्याच्या वस्तीपासूनचे अंतर, जागा खासगी आहे की शासकीय आहे. खासगी असल्यास राबवावी लागणारी खरेदी प्रक्रिया, असा संपूर्ण प्रस्ताव सादर करावा. पुनर्वसनाबाबत महसूल, वन व पुनर्वसन विभागाची संयुक्त बैठक आयेाजित करावी.
अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. या धरणाच्या बाधित गावांमध्ये 18 प्रकारच्या नागरी सुविधा दिलेल्या आहेत की नाही, दिलेल्या असल्यास कोणत्या सुविधा आहेत, त्यांची सद्यस्थिती कशी आहे, द्यावयाच्या असल्यास विभागाने करावयाच्या खर्चाची तरतूद, याबाबत विभागाने सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसात सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले. बैठकीला सिद्धगड येथील ग्रामस्थ, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
****
निलेश तायडे/विसंअ/