• Sat. Sep 21st, 2024

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

ByMH LIVE NEWS

Aug 25, 2023
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २५ : लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यात आज सामंजस्य करार झाला. लोरियल इंडिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३५ ब्युटी पार्लर उभारणार आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामधील ५ महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार असून राज्यातील १७५ महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेतील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे माविम आणि वर्ल्ड इकॉनॉमी फोरममार्फत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतमाल विक्रीची साखळी निर्माण करणे (Transforming Farm to Market Value chains leveraging technology in Maharashtra) या कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या.

यावेळी  महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव,महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, सेंटर फॉर हेल्थ इंडस्ट्रियल रिवोल्यूशन वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरमचे हेड पुरुषोत्तम कौशिक, लोरिअल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आसिफ कौशिक यांच्यासह विविध १९ स्टेक होल्डर्स उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, माविम हे महिला बचतगटांचे अत्यंत उत्कृष्ट संघटन आहे. इकॉनॉमी फोरममार्फत अत्याधुनिक तंत्र व कौशल्य विकास करून शेतमाल विक्रीची साखळी निर्माण करण्यासाठी राज्यातील ‘माविम’च्या बचत गटामार्फत नक्कीच शक्य होणार आहे. आज येथे  विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्टेक होल्डर यांच्या माध्यमातून महिला व बचतगटांना एक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण मिळून अत्याधुनिक बाजारपेठेची माहिती मिळण्यास मदत होईल. ‘माविम’  आणि लोरियल इंडिया यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे प्रत्येक जिल्ह्यामधील ५ महिलांना प्रशिक्षित करण्यात येणार असून  राज्यातील १७५ महिला या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. लोरियल इंडिया राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ३५ ब्यूटी पार्लर उभारणार आहे. यामध्ये ‘माविम’चे देखील सहकार्य लाभणार, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

‘माविम’ अंतर्गत असलेल्या लोकसंचलित साधन केंद्र (CMRC) यांच्या माध्यमातून विविध स्वरुपाच्या व्हॅल्यूचेन सबप्रोजेक्टची उत्पादन साखळीपासून बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी  विविध स्टेक होल्डर्स यांनी यावेळी आपले सादरीकरण केले. ‘माविम’ उत्पादक कॅटलॉगचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यामध्ये ग्रामीण भागातील स्वयंसहायत्ता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या निवडक उत्पादनांची माहिती या  कॅटलॉगचे यामध्ये देण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. यादव व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. जाखड यांनी मनोगत व्यक्त केले.

 

000

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed