• Mon. Nov 25th, 2024
    Navi Mumbai: सर्वसामान्यांना दिलासा; टोमॅटोचे भाव उतरले, किरकोळ बाजारातील दर आता…

    मनीषा ठाकूर, नवी मुंबई : गेल्या महिनाभरापासून दीडशे रुपयांवर गेलेले टोमॅटोचे भाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो १०० रुपये किलोने मिळू लागल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

    मागील आठ महिने टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो अक्षरश: फेकून द्यावा लागला होता. त्यामुळे यंदा अनेक शेतकऱ्यांनी पावसाळ्यासाठी टोमॅटोची लागवडच केली नाही. त्यामुळे उत्पादन घटले. बाजारातही अवघे ३० टक्के टोमॅटो येत होते. परिणामी टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले. मुंबईच्या घाऊक बाजारात टोमॅटो ८० ते १०० रु. किलो झाला होता. त्यामुळे किरकोळ बाजारातील भाव १५० ते १६० रुपयांवर गेले. टोमॅटोच्या किंमतीत इतकी मोठी वाढ प्रथमच झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारलाही टोमॅटोच्या भावांची दखल घ्यावी लागली.

    Mumbai Local: घराबाहेर पडण्यापूर्वी ही बातमी वाचा; डहाणू लोकल आज अंशत: रद्द, कारण…
    मुंबई बाजारात टोमॅटोची मागणी पूर्ण करण्यासाठी दररोज सरासरी ४० गाड्या टोमॅटोची गरज असते. मात्र ही आवक अवघ्या १० ते १५ गाड्यांवर आली होती. मुंबईला सातारा, सांगली आणि पुणे येथून टोमॅटोची आवक होत होती. ती केवळ तीस टक्के इतकीच होती. मागणी पूर्ण करता येत नसल्याने टोमॅटोचे भाव वाढले होते. मात्र आता या तीन जिल्ह्यांसह नाशिक, पिंपळगावहूनही टोमॅटोची आवक मुंबई बाजारात सुरू झाली आहे. शिवाय, औरंगाबादहूनही टोमॅटो येत आहेत. त्यामुळे एकूण १५ ते २० गाड्या टोमॅटो दररोज बाजारात दाखल होत आहे. सध्या १०० टक्के आवक होत नसली, तरी ती ५० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. परिणामी टोमॅटोच्या किंमतीत घसरण सुरू झाली आहे. घाऊक बाजारात टोमॅटो ५० ते ८० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात १०० रु. किलोने मिळू लागला आहे. काही ठिकाणी हे भाव १२० रु. आहेत. मात्र किलोमागे ५० रु. कमी झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

    कांद्याच्या किंमतीत मात्र वाढ

    दुसरीकडे, कांद्याच्या भावाने मात्र उचल खाल्ली असून, पंधरा दिवसांपूर्वी २५ रु. किलो असणाऱ्या कांद्याचे भाव ३५ रुपयांवर गेले आहेत. मागील महिन्यात आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी साठवून ठेवलेला कांदा भिजला. त्यामुळे काही प्रमाणात कांदा खराब होऊ लागला. परिणामी, बाजारात मागील आठवड्यापासून ओला कांदा येत आहे. चांगला कांदा फारच कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू लागले आहेत. येणारा सणासुदीचा काळ पाहता हे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. गणेशोत्सवापर्यंत कांदा १०० रु. किलो होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी बांधला आहे.

    सातारा, सांगलीबरोबर राज्यातील इतर भागातूनही मुंबई बाजारात टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढत राहिली, तर भाव पूर्वपदावर येऊन स्थिर होतील. येत्या १५ ते २० दिवसांत टोमॅटोचे भाव सर्वसाधारण पदावर येतील.

    – तानाजी चव्हाण, टोमॅटोचे घाऊक व्यापारी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed